हेल्मेट वापराचे बंधपत्र सक्तीचे
By Admin | Updated: January 23, 2015 00:40 IST2015-01-23T00:03:31+5:302015-01-23T00:40:14+5:30
माझ्या स्वत:च्या तसेच माझ्यामागे बसलेल्या व्यक्तीच्या सुरक्षिततेसाठी मी सदर तरतुदीचे पालन करीन,

हेल्मेट वापराचे बंधपत्र सक्तीचे
कोल्हापूर : दुचाकी वाहन चालविताना हेल्मेट परिधान करण्याविषयी अप्पर परिवहन आयुक्त सतीश सहस्त्रबुद्धे यांनी नवीन लायसेन्स व गाडीची नोंदणी करताना हेल्मेट वापराविषयीचे बंधपत्र सक्तीचे केले आहे. या निर्णयाची अंमलबजावणी आज, गुरुवारपासून राज्यातील सर्व प्रादेशिक परिवहन कार्यालयांत सुरू झाली. हेल्मेट वापरण्याविषयी जागृती कमी पडत असल्याने राज्यात दिवसें-दिवस दुचाकीस्वारांचे अपघातात मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे वाढत्या अपघातांना आळा घालण्यासाठी सुरक्षित ड्रायव्हिंग व दुचाकी नवीन घेताना हेल्मेटही देण्याचे प्रस्ताव डिलरांकडून दिले जात आहेत. मात्र, हेल्मेट न वापरण्याचा एक ट्रेंड कोल्हापुरात आहे. आम्ही काय पुणे, नागपूर, मुंबई अशा मोठ्या शहरांत राहतो काय? असा सवाल उलटा विचारला जात आहे. कोल्हापूर तर छोटे शहर आहे. त्यामुळे हेल्मेट वापरत नाही, असे अनेकांचे उत्तर असते.
बंधपत्र असे
१९८८ च्या कलम १२९ अन्वये दुचाकी चालवताना वाहनचालकाने तसेच त्याचा मागे बसलेल्या व्यक्तीने वाहन चालविले जात असताना स्वत:च्या सुरक्षिततेसाठी हेल्मेट वापरणे बंधनकारक आहे. या बंधपत्रात माझ्या स्वत:च्या तसेच माझ्यामागे बसलेल्या व्यक्तीच्या सुरक्षिततेसाठी मी सदर तरतुदीचे पालन करीन, असे या बंधपत्रात लिहून घेतले जाते.
नवीन दुचाकी खरेदीदारांना व लायसेन्स काढणाऱ्यांना हेल्मेट कायम वापरणार म्हणून कार्यालयातर्फे बंधपत्र घेतले जात आहे. विमा कंपन्यांनी दुचाकीचा विमा देताना हेल्मेट घातले होते का याची शहानिशा करून क्लेम द्यावा. त्यामुळे तरी हेल्मेट घातले जाईल.
- राजेंद्र वर्मा
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी,
वाढत्या वाहनसंख्येमुळे वारंवार अपघात होत आहेत. याशिवाय महामार्गावर जाताना हेल्मेट घालणे सक्तीचे आहे. याशिवाय हेल्मेटमुळे धुरळ्यापासून बचाव होतो तसेच अपघात झाल्यास डोके शाबूत राहते. त्यामुळे मी कायम हेल्मेट वापरतोच.
- एम. एम. पाटील, बुजवडे