बेरजेच्या राजकारणामुळेच नरकेंची बाजी
By Admin | Updated: October 22, 2014 00:24 IST2014-10-21T23:58:05+5:302014-10-22T00:24:57+5:30
तडजोडीचे राजकारण न करता कार्यकर्त्यांचा पोकळ आत्मविश्वास पी. एन. पाटील यांना नडला आहे

बेरजेच्या राजकारणामुळेच नरकेंची बाजी
राजाराम लोंढे - कोल्हापूर -मतदारसंघातील घरोघरी ठेवलेला थेट संपर्क, केलेल्या विकासकामांमुळेच आमदार चंद्रदीप नरके यांचा विजय सुकर झाला, तर निवडणुकीच्या तोंडावर अंगावर घेतलेली राष्ट्रवादी, तडजोडीचे राजकारण न करता कार्यकर्त्यांचा पोकळ आत्मविश्वास पी. एन. पाटील यांना नडला आहे, असेच करवीर मतदारसंघातील निकालाचे विश्लेषण करावे लागेल. दोघांतच काटा लढत असल्याचे लक्षात आल्यानंतर ‘जनसुराज्य’चे राजू सूर्यवंशी व ‘भाजप’चे के. एस. चौगले यांना मतदारांनीच स्पर्धेतून बाजूला केले. कुंभी कासारी साखर कारखान्याच्या माध्यमातून चंद्रदीप नरके यांचा या ना त्या मार्गाने संपर्क कायम राहिला. जनतेच्या सुख-दु:खात थेट सहभागी होत असल्याने त्यांच्याबद्दल सामान्य माणसात कमालीची सहानुभूती होती. मतदारसंघातील काही ठरावीक गावे सोडली तर त्यांच्याकडे फारसे ताकदीचे नेतेही नाहीत; पण थेट कार्यकर्त्यांसह जनतेशी असलेल्या संपर्काच्या बळावर त्यांनी मुसंडी मारली.
विरोधी आमदार असतानाही त्यांनी केलेली विकासकामे निश्चितच विचार करायला लावणारी आहेत. मतदारसंघातील प्रलंबित प्रश्नांबाबत विधानसभेत आवाज उठवून तो पद्धतशीर जनतेपर्यंत पोहोचविला. टोलच्या आंदोलनात आक्रमक घेतलेली भूमिकाही निवडणुकीत निर्णायक ठरली. संपर्क व विकासकामे बरोबर घेत त्यांनी प्रचाराचे नेटके नियोजन केले होते. आमदार नरके यांचे बंधू अजित नरके गगनबावड्यात, तर काका अरुण नरके पन्हाळ्यात तळ ठोकून होते. आमदार नरके यांनी आपल्या शिलेदारांना घेऊन करवीरच्या गडाला मोठे भगदाड पडणार नाही, याची खबरदारी घेतली.
गेल्या विधानसभा निवडणुकीत अवघ्या साडेपाच हजारांनी चंद्रदीप नरके विजयी झाले होते. पी. एन. पाटील यांच्यासारख्या तगड्या विरोधकाला टक्कर देणे सोपे नव्हते, याची जाणीव आ. नरके यांना होती. या निवडणुकीची तयारी पाटील यांनी गेल्या दोन वर्षांपासून सुरू केल्याने नरके यांना अंदाज आला होता. त्यामुळे तडजोडीचे धोरण स्वीकारत त्यांनी एक एक फासे टाकण्यास सुरुवात केली. पहिल्यांदा त्यांनी राष्ट्रवादी कॉँग्रेसबरोबर संधान साधून त्यांना आपल्याकडे वळविण्यात यश मिळविले. गत विधानसभा निवडणुकीत नरके गगनबावडा तालुक्यात तब्बल साडेतीन हजार मतांनी पिछाडीवर होते. या तालुक्यात यावेळी मताधिक्य घेण्यासाठी जिल्हा बॅँकेचे माजी अध्यक्ष पी. जी. शिंदे यांच्याबरोबर तडजोड करून नरके यांनी दुसरी खेळी यशस्वी केली.
ही निवडणूक म्हणजे काठावरची लढत असल्याचे लक्षात आल्यानंतर नरके यांनी अंतर्गत तडजोडी सुरू केल्या; पण करवीरमध्ये त्यांच्या हाताला फारसे लागत नसल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी आपले लक्ष पन्हाळ्यावर केंद्रित केले. त्यामुळेच पन्हाळ्यातून तब्बल चौदा हजारांचे मताधिक्य नरके यांना मिळाले. पी. जी. शिंदे अडीच हजारांचे मताधिक्य घेऊनच आल्याने पन्हाळा-बावड्यातून चंद्रदीप नरके यांना साडेसोळा हजारांचे मताधिक्य करवीरमध्ये मिळाले. जुन्या करवीरमध्ये त्यांना अपेक्षित मताधिक्य मिळाले नसल्याने त्यांना काठावरचा विजय मिळाला.
पी. एन. पाटील यांनी आक्रमक प्रचार यंत्रणा राबविली. गल्लोगल्ली प्रचार करून वातावरण निर्मिती केली होती. त्यातच जुन्या करवीर व सांगरूळमध्ये पाटील यांच्याबाबत सहानुभूतीची एक सुप्त लाट होती. त्याचा फायदा नरके यांचे मताधिक्य कमी करण्यात झाला. पी. एन. पाटील यांच्या तीन वेळा झालेल्या पराभवामुळे कॉँग्रेस कार्यकर्ते पेटून उठले होते. विशेषत: तरुण वर्गाचा पाठिंबा त्यांना मिळाला होता; पण पन्हाळा व गगनबावडा तालुक्यांकडे त्यांनी फारसे गांभीर्याने पाहिले नसल्याने त्याचा फटका पाटील यांना बसला.
मार्केटिंगच पथ्यावर !
मतदारसंघात लहानातील लहान जरी विकासकाम केले, तरी त्याच्या प्रसिद्धीचे नियोजन आमदार नरके यांचे नेटके होते. त्याचे डिजिटल लावून त्याचे मार्केटिंग करण्यात ते पुढे होते. विरोधकांनी जरी त्यांच्यावर याबाबत टीका केली असली, तरी हेच मार्केटिंग त्यांच्या पथ्यावर पडले.
‘संपर्का’भोवतीच फिरली निवडणूक
संपर्काशिवाय पी. एन. पाटील यांच्याविरोधात बोलण्यास एकही मुद्दा नरके यांच्याकडे नव्हता. त्यामुळे पाटील यांनी विकासकामे व पक्षनिष्ठेचा मुद्दा अगदी ताकदीने प्रचारात आणला, तर नरके यांनी पाटील यांच्या संपर्कावरच बोट ठेवून आक्रमक प्रचार केला.
बेरजेच्या राजकारणात अपयश
गतवेळी साडेपाच हजार मतांनी पराभव झाल्यानंतर पी. एन. पाटील यांनी जुन्या करवीरसह पन्हाळ्यात कॉँग्रेसचे गट निर्माण केले. काठावरील लढाई असल्याने काही मोठ्या तडजोडी करून बेरजेचे राजकारण करणे गरजेचे होते. पाटील यांनी काही ठिकाणी प्रयत्नही केले; पण त्यामध्ये ते फारसे यशस्वी झाले नाहीत.
‘कुंभी’ अलिप्त!
करवीरच्या राजकारणाचा केंद्रबिंदू हा कुंभी-कासारी साखर कारखाना आहे. गेल्या निवडणुकीत प्रचाराचे केंद्रबिंदू ‘कुंभी’ कारखानाच होता; पण या निवडणुकीत कुंभी प्रचारापासून अलिप्त राहिला.
पराभवाची कारणे
विद्यमान आमदारांबद्दलची काही प्रमाणात निर्माण झालेली नाराजी
जुन्या करवीर- मध्ये पी. एन. पाटील यांनी केलेले पॅचवर्क
कुंभी-कासारी यंत्रणा गेल्या वेळच्या तुलनेत आक्रमक झाली नाही
जुन्या सांगरूळ- मध्ये ताकद निर्माण करण्यात अपयश