आबांच्या श्रमाला रिक्षाचालकांचा सलाम

By Admin | Updated: September 4, 2015 00:55 IST2015-09-04T00:55:15+5:302015-09-04T00:55:15+5:30

८१ व्या वर्षीही प्रवाशांची सेवा : नव्या पिढीपुढे पारिसनाथ कळंत्रेंचा आदर्श

Hello to rickshaw drivers | आबांच्या श्रमाला रिक्षाचालकांचा सलाम

आबांच्या श्रमाला रिक्षाचालकांचा सलाम

प्रवीण देसाई -कोल्हापूर  निवृत्तीच्या वयातही रिक्षा चालवून घरसंसार चालविणारे पारिसनाथ बाबूराव कळंत्रे (आबा) यांनी आजच्या पिढीसमोर आदर्श निर्माण केला आहे. या ज्येष्ठ व्यक्तिमत्त्वाचा त्यांच्या सहकाऱ्यांनी ८१ वा वाढदिवस साजरा केला. ते रिक्षाचालकांच्या जुन्या पिढीतील एकमेव ज्येष्ठ सदस्य आहेत. गेल्या ५७ वर्षांपासून अविरतपणे फिरणारी त्यांची रिक्षा नजरेत भरणारी आहे.
रिक्षाचालकांचे लाडके ‘आबा’ म्हणून परिचित असलेल्या पारिसनाथ कळंत्रे यांचा जन्म कुंभोज (ता. हातकणंगले) येथे १५ आॅगस्ट १९३५ रोजी झाला. त्यानंतर काही वर्षांत वडील नोकरीनिमित्त कोल्हापुरात शुक्रवार पेठेत राहिले. कळंत्रे आबांनी कसबा गेट येथील गणेश प्रासादिक मराठी शाळा येथे इयत्ता चौथीपर्यंतचे शिक्षण घेतले. पुढील इयत्ता नववीपर्यंतचे शिक्षण प्रायव्हेट हायस्कूल येथे, तर इयत्ता दहावीपर्यंतचे नाईट हायस्कूल येथे झाले. यानंतर शिक्षण बंद करून किरकोळ नोकऱ्या केल्या. १९६०मध्ये त्यांचा विवाह इंदिरा यांच्याशी झाला. १९६१ मध्ये ते कसबा बावडा येथील कोल्हापूर केन शुगर वर्क्स येथे (सध्याचा छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना) हंगामी तत्त्वावर चिटबॉय म्हणून रुजू झाले. पुढे त्यांना दोन मुले व मुलगी झाली. मुळात हंगामी कर्मचारी असल्याने तुटपुंजा पगार व कुटुंबाची जबाबदारी, त्यामुळे त्यांनी रात्री रिक्षा चालवायला सुरुवात केली. दिवसा नोकरी करीत असताना सर्व श्रमिक संघाच्या साखर कामगार युनियनचेही काम केले. ते १९९५ मध्ये येथून क्लार्क म्हणून निवृत्त झाले. निवृत्तीपूर्वी आठ वर्षे ते कायम झाले. त्यांना फक्त भविष्यनिर्वाह निधीची एक हजार रुपये पेन्शन मिळत आहे. ‘आधार’ रिक्षा हीच आपली आयुष्याची साथी मानूून ते पूर्णवेळ रिक्षा व्यवसाय करीत आहेत. त्यांनी एक-एक पैसा जोडत कळंबा रोडवरील राजीव गांधी नगर येथे स्वत:चे घर बांधले. ते बिनखांबी गणेश रिक्षा मित्रमंडळाचे सदस्य आहेत. त्यांची ‘आधार’ नावाची एमए ०९ जे ५३६२ ही रिक्षा सर्व प्रवाशांसाठी आधारवड आहे. मोहन बागडी, संजय राऊत, नामदेव मोरे, यशवंत जाधव, बाळासाहेब शिंदे, पांडुरंग पाटील या सहकाऱ्यांनी वाढदिवस साजरा केला. या प्रेमाने आबा भारावून गेले आहेत.



संकटालाही जिद्दीने सामोरे
त्यांच्या शीतल या मुलाचे २००४ मध्ये निधन झाल्याने कुटुंबावर डोंगर कोसळला; परंतु न डगमगता त्यांनी नातवांच्या पालनपोषणाची व शिक्षणाची जबाबदारी उचलली. तसेच पत्नी इंदिरा यांच्यावरही दोन वर्षांपूर्वी अ‍ॅँजिओप्लास्टीची शस्त्रक्रिया झाली. असे अनेक आघात सहन करून दु:खातही चेहऱ्यावरील हास्य कायम ठेवत कळंत्रे आबा नेटाने पुढे जात आहेत.

Web Title: Hello to rickshaw drivers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.