येळ्ळुरात कर्नाटक पोलिसांचा हैदोस

By Admin | Updated: July 28, 2014 00:33 IST2014-07-28T00:32:44+5:302014-07-28T00:33:07+5:30

‘तो’ फलक पुन्हा हटवला : मराठी भाषिक, महिला, विद्यार्थ्यांना घरांत घुसून बेदम मारहाण, वाहनांची तोडफोड

Hedos of the Karnataka Police in Yelutur | येळ्ळुरात कर्नाटक पोलिसांचा हैदोस

येळ्ळुरात कर्नाटक पोलिसांचा हैदोस

बेळगाव : येळ्ळूरच्या मराठी भाषिकांनी उभारलेला ‘महाराष्ट्र राज्य - येळ्ळूर’ फलक रविवारी सकाळी सहाच्या सुमारास कर्नाटक पोलिसांनी जमीनदोस्त केला. या कारवाईला विरोध करण्यासाठी गेलेल्या महिलांवरही पोलिसांनी अमानुषपणे लाठीमार करून हैदोस घातला. पाठोपाठ येळ्ळूर गावात शिरून पोलिसांनी गावातील प्रत्येकाच्या घरात घुसून अक्षरश: धुडगूस घातला. घरातील वस्तूंची तोडफोड करून अनेकांना बेदम मारहाण केली, तर अनेक वाहनांचेही पोलिसांनीच नुकसान केले. पोलिसांनी सातजणांना अटक केली आहे. पोलिसांचा हा धुडगूस येळ्ळूरमध्ये सुमारे अर्धा तास सुरू होता.
येळ्ळूरच्या मराठी भाषिकांनी उभारलेला ‘महाराष्ट्र राज्य - येळ्ळूर’ फलक हटविण्यासाठी कर्नाटक पोलिसांची फौज रविवारी पहाटेच येळ्ळूरमध्ये दाखल झाली. यावेळी सकाळी महिला आपल्या दारात रांगोळ्या घालत होत्या. पोलिसांनी त्यांना हटकून हुज्जत घातली. त्यानंतर पोलिसांनी सकाळी फलक काढला. यावेळी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. महिलांशी हुज्जत घातल्याने याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या मराठी भाषिकांना पोलिसांनी लक्ष्य केले.
विराट गल्ली, कलमेश्वर गल्ली, लक्ष्मी गल्ली, शिवाजीनगर आणि शिवाजी रोड या भागांत पोलिसांनी खाकी वर्र्दीतील गुंड असल्याप्रमाणे वर्तन केले. गावातील मराठी भाषिकांच्या घरांचे बंद दरवाजे तोडून पुरुष, महिला, तरुणांना त्यांनी काठी, लाथा-बुक्क्यांनी अक्षरश: झोडपून काढले. घरांच्या काचा फोडल्या. रस्त्यावर उभ्या असणाऱ्या दुचाकी-चारचाकी वाहनांचीही मोडतोड केली. माजी जिल्हा पंचायत सदस्य अर्जुन गोरल हे शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्नशील होते; पण त्यांनाही पोलिसांनी बेदम मारहाण केली. त्यामध्ये त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने ते रक्तबंबाळ झाले. आपल्या घरात दोन महिन्यांच्या तान्हुल्याला घेऊन बसलेल्या /पान ४ वर

केंद्र शासनाकडे दाद मागणार : मुख्यमंत्री
मराठी बांधवांवर होणारे अत्याचार चुकीचे आहेत़ कर्नाटक पोलिसांकडून निर्माण केली जाणारी दहशत खपवून घेणार नाही़, असा इशारा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिला. येथील शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री बोलत होते़ ते म्हणाले, सीमा भागातील मराठी बांधवांवर होणाऱ्या अत्याचारांबाबत यापूर्वी केंद्र सरकारशी बोललो होतो़ आता पुन्हा हा प्रश्न समोर आला आहे. त्यामुळे तातडीने केंद्राशी चर्चा करू.

तीन हजार पोलीस.... पहाटेची कारवाई
रविवारी पहाटेच्या सुमारास पोलीस गाड्यांचे ताफे, तीन हजारांहून अधिक पोलीस अशा फौजफाट्यासह जिल्हाधिकारी एन. जयराम आणि जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. चंद्र गुप्त यांच्या नेतृत्वात गावाच्या सर्व सीमा बंद केल्या. पोलीस बंदोबस्तात हा फलक पुन्हा उद्ध्वस्त केला. गावात रांगोळी घालणाऱ्या महिलांना घराबाहेर पडू दिले नाही. ज्यांनी ही घटना पाहिली, जाब विचारला, त्या महिलांना अक्षरश: बेदम मारहाण केली.

मराठी भाषिकांना झालेल्या अमानुष मारहाणीचा निषेध व्यक्त करत निपाणी विभाग महाराष्ट्र एकीकरण समिती आणि शिवसेनेच्या वतीने उद्या, सोमवारी ‘निपाणी बंद’ची हाक दिली आहे; तर सोमवारी रात्री १२ वाजेपर्यंत १४४ कलम व जमावबंदीचा आदेश जिल्हाधिकारी एन. जयराम यांनी दिला आहे . / वृत्त ४

Web Title: Hedos of the Karnataka Police in Yelutur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.