मुसळधार पावसाने झोडपले
By Admin | Updated: July 10, 2016 01:44 IST2016-07-10T01:25:53+5:302016-07-10T01:44:16+5:30
बळिराजा सुखावला : धरणक्षेत्रात धुवाधार, नद्यांच्या पाणीपातळीत वाढ, अनेक बंधारे पाण्याखाली

मुसळधार पावसाने झोडपले
कुं भोज परिसरात समाधान
कुंभोज : कुंभोजसह परिसरात शनिवारी झालेल्या जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे. खरा पावसाळा आता कुठे सुरू झाला, अशा प्रतिक्रिया सर्वत्र ऐकायला मिळाल्या. रोहिणी व मृग नक्षत्रांत समाधानकारक पाऊस न झाल्याने पेरण्या खोळंबल्या. उगवून आलेल्या पिकांची वाढ खुंटल्याने शेतकरीवर्ग चिंतेत होता. भुरभुर पडणाऱ्या पावसामुळे पिकांवर किडीचा प्रार्दुभाव वाढत चालला होता. विहिरी, कूपनलिका तसेच नद्यांची पाणीपातळी वाढली असली तरी भात व ऊस पिकांच्या नैसर्गिक वाढीसाठी मोठ्या पावसाची आवश्यकता होती. शनिवारी दिवसभर कुंभोजसह हिंगणगाव, दुर्गेवाडी, नेज, शिवपुरी, बाहुबली, नरंदे, सावर्डे तसेच कापूरवाडी परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे शेतकरी सुखावला आहे.
करवीर पश्चिममध्ये संततधार
सावरवाडी : करवीर तालुक्याच्या पश्चिम भागात शनिवारी दिवसभर जोरदार पाऊस झाल्याने भोगावती, तुळशी, कुंभी नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. भोगावती नदीतील बहिरेश्वर ते कोगे व कोगे ते कुडित्रे हे दोन बंधारे पाण्याखाली गेल्याने पश्चिम भागातील ग्रामीण वाहतूक बंद झाली आहे. या मार्गावरील बीडशेड मार्गे वाहतूक सुरू आहे. संततधार पावसामुळे डोंगरी भागात नाचणी लागण मोठ्या प्रमाणात सुरू झाली. जोरदार स्वरूपाच्या पावसामुळे शेतीची मशागतीची कामे ठप्प झाली आहेत.
आजऱ्यात धुवाधार;
नद्यांच्या पाण्यात वाढ
आजरा : आजरा शहरासह शनिवारी दिवसभर जोरदार पावसाने हजेरी लावली. पावसामुळे नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. दरम्यान, आजरा शहरातील मुख्य बाजारपेठेला तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले होते. आजरा तालुक्यात शनिवारी दुपारी जोरदार पावसाने हजेरी लावल्याने जनजीवन विस्कळीत झाले. हिरण्यकेशी व चित्रा नद्या दुथडी भरून वाहत आहेत. रात्री उशिरापर्यंत पावसाच्या जोरदार सरी कोसळत होत्या. पावसामुळे भात रोप लावणीची काम वेगावली आहेत. शेतकरीवर्ग मात्र सुखावला आहे.
कागलमध्ये संततधार
कागल : शहर आणि परिसरात शनिवारी दिवसभर मुसळधार पावसाने हजेरी लावली. या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले होते. दिवसभराच्या पावसाने सर्वत्र पाणी होते. रस्ते पाण्याने भरून वाहत होते. सकाळी नऊ वाजल्यापासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली. काही कालावधीकरिता पावसाच्या सरी थांबत होत्या. मात्र, हे प्रमाण कमी होते. येथील महामार्गावरील भुयारी पुलाच्या खाली पावसाचे पाणी साचले होते. यामुळे या भुयारी मार्गातून होणारी वाहतूक थांबली होती. पंचायत समितीसमोरील भुयारी मार्ग, आर.टी.ओ. चेकपोस्टजवळील भुयारी पुलाखाली गुडघाभर पाणी साचले होते. दुचाकी वाहनचालकांना यातून वाहन नेणे अवघड झाले. शहराच्या मुख्य बाजारपेठ रस्त्यावरही पाणी वाहत होते, तर बसस्थानक परिसर, छ. शिवाजी महाराज पुतळा चौकातही पावसाचे पाणी जमा झाले होते. दिवसभर या पावसाने कागल शहर परिसरातील ओढे, नाले, वगळाटीतून पहिल्यांदाच पाणी वाहू लागल्याचे चित्र होते.
मलकापूर परिसरात जोर कायम
मलकापूर : शाहूवाडी तालुक्यात पावसाचा जोर कायम राहिला असून, दिवसभर संततधार सुरू होती. रोप लागणीसाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे. शाहूवाडी तालुक्यातील मांजरे, येळवण, विशाळगड, आंबा, गावडी, कुंभरोडसह परिसरात पावसाचा जोर कायम राहिला होता. शनिवारी पावसाची संततधार सुरू होती. सततच्या पावसामुळे कडवी, शाळी, नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. रोप लावणीस पूरक पाऊस सुरू असल्याने शेतकरीवर्गातून समाधान व्यक्तहोत आहे.
गारगोटी परिसरात पाणीच पाणी
गारगोटी : भुदरगड तालुक्यातील गारगोटी शहरासह ग्रामीण भागात धुवाधार
पावसाने रस्त्यावर पाणीच पाणी
करून टाकले. शेतकरी रोप लावणीच्या कामात मग्न होता. गारगोटी शहरात शनिवारी दुकाने बंद असतात आणि त्यातच पावसाने जोरदारपणे हजेरी लावल्याने शहरात शुकशुकाट जाणवत होता.
भोगावती परिसरात मुसळधार
भोगावती : भोगावती परिसर, राधानगरी, करवीर तालुक्यांत शनिवारी मुसळधार पाऊस पडला आहे. दुपारी एकपासून सुरू झालेली संततधार रात्री उशिरापर्यंत सुरू होती. शनिवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे भोगावती नदीच्या पाणीपातळीत तब्बल सात फूट वाढ झाली आहे. राधानगरी आणि करवीर तालुका शनिवारी जलमय झाला असून, पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. मृग नक्षत्रानंतर पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस लागला आहे. गावागावांतील संपूर्ण रस्त्यावर पाणी वाहू लागले होते, तर काही ठिकाणी घरात पाणी शिरले होते. शनिवारी झालेल्या पावसाने शेतकरी सुखावला आहे. कोल्हापूर-भोगावती रस्त्यावर कुरुकली येथे पावसाने झाड कोसळले. ते बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.
कडवीचे पाणी पात्राबाहेर
आंबा : परिसरात शनिवारी सकाळपासून सुरू झालेल्या संततधार पावसामुळे कडवी नदीचे पात्र प्रथमच ओसंडून वाहू लागले आहे. केर्ले ते निळे दरम्यानचा कडवी खोरा जलमय झाला आहे. नदीपासून सुमारे दीडशे फूट परिसरातील शिवारात नदीचे पाणी सुमारे दोन फुटांपर्यंत साठले आहे. त्यामुळे या भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. वाऱ्याचा जोर असल्याने वीजपुरवठाही विस्कळीत झाला. सरीदार पावसाबरोबर धुकेही मोठ्या प्रमाणात असल्याने आंबा व विशाळगड घाटातून तारेवरची कसरत करीत दळणवळण सुरू आहे.
मुरगूड परिसरात जोरदार पाऊस
मुरगूड : मुरगूड शहर आणि परिसरात शनिवारी दिवसभर जोरदार पाऊस झाला. या पावसाने ओढे, नाले यंदा प्रथमच भरून वाहू लागले आहेत. कित्येक दिवस हुलकावणी देणाऱ्या पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे शेतकरी सुखावला आहे. गेल्यावर्षी पावसाचे अत्यल्प प्रमाण राहिल्याने मुरगूड शहरात व परिसरात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला होता. त्यामुळे शेतकरीवर्ग धास्तावला होता. शनिवारी सकाळी पावसाने पूर्णपणे उघडीप दिली होती; पण दुपारी १२ वा.पासून जोरदार पावसाला सुरुवात झाली. यामुळे वेदगंगा नदीतील व शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सर पिराजीराव तलावामधील पाणीपातळी झपाट्याने वाढत आहे.
राधानगरीत ३.६३ टीएमसी साठा
राधानगरी : मुसळधार पावसाने शनिवारी दिवसभर तालुक्याला झोडपून काढले. धरणाच्या परिसरात पावसाचा जोर जास्त होता. यावर्षी पहिल्यांदाच पावसाने जोरदार हजेरी लावली. गेले दोन दिवस पावसाचा जोर मंदावला होता.
मात्र, शनिवार सकाळपासूनच अधूनमधून जोराचा पाऊस कोसळत होता. दुपारी किमान चार तास जोरदार पाऊस झाला. यामुळे ओढे-नाले भरून वाहू लागले, तर सर्व शेतातही पाणीच पाणी झाले. नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली. राधानगरी धरणात ३.६३ टीएमसी साठा झाला आहे. वादळी वाऱ्यामुळे झाडाची पडझड झाली. वीजपुरवठाही खंडित झाला आहे.
शिरोळला जोरदार हजेरी
जयसिंगपूर : आठ दिवसांपासून हुलकावणी दिलेल्या पावसाने शनिवारी जयसिंगपूर, शिरोळ, उदगावसह परिसरात जोरदार हजेरी लावली. या पावसाने शेतकरीवर्गातून समाधान व्यक्त होत आहे. शिरोळ तालुक्यात पुराची जास्त आणि पावसाची कमी हमी अशी परिस्थिती असते. पंधरा दिवसांपासून पाऊस नसल्यामुळे शेतकरी चिंचेत होता. मात्र, शनिवारी झालेल्या पावसामुळे शेतीला फायदा होणार आहे.
बंधारे पाण्याखाली
कुरुंदवाड : मुसळधार पावसामुळे शिरोळ तालुक्यातील कृष्णा, वारणा, दुधगंगा, पंचगंगा दुथडी भरून वाहत असून शिरोळ, तेरवाड, राजापूर बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
गडहिंग्लजला पाणी पाणी
गडहिंग्लज : गडहिंग्लज शहरासह तालुक्यात शनिवारी पावसाने जोरदार हजेरी
लावली. यावर्षी पहिल्यांदाच पावसाने जोरदार हजेरी लावली.