कोल्हापुरात पावसाचा धिंगाणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:22 IST2021-05-17T04:22:48+5:302021-05-17T04:22:48+5:30

दुपारनंतर पावसाने झोडपले उन्हाळी पिकांची दाणादाण आडसाली ऊस जमिनावर लोळला लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : तौउते चक्रीवादळच्या रूपाने आलेल्या ...

Heavy rains in Kolhapur | कोल्हापुरात पावसाचा धिंगाणा

कोल्हापुरात पावसाचा धिंगाणा

दुपारनंतर पावसाने झोडपले

उन्हाळी पिकांची दाणादाण

आडसाली ऊस जमिनावर लोळला

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : तौउते चक्रीवादळच्या रूपाने आलेल्या पावसाने कोल्हापुरात अक्षरशः धिंगाणा घातला. जोरदार वारे आणि पावसामुळे झाडे उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या. वाहतूक खोळंबली, वीजप्रवाहदेखील खंडित झाला. लॉकडाऊनच्या पहिल्याच दिवशी पावसाने सर्वांनाच सक्तीने घरातच बंदिस्त केले. दुपारनंतर संततधार पावसाने झोडपून काढले.

सकाळपासून जोरदार वारे आणि किरकोळ सरींनी आगमन केलेल्या पावसाने दुपारनंतर मात्र चांगलाच जोर धरला. तशी या वादळी पावसाने शनिवारी संध्याकाळीच धडक दिली होती. सातनंतर विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा रविवारी पहाटेपासूनच जोर धरला होता. जोरदार वारेही वाहत असल्याने प्रचंड थंडीही जाणवत होती. अधून-मधून एखादं दुसरी सरदेखील येत होती. पावसाळी वातावरणामुळे दिवसभर सूर्यदर्शनदेखील झाले नाही.

दुपारी दोननंतर पावसाचा जोर वाढला. धो धो कोसळणाऱ्या सरीमुळे पावसाळ्याआधीच मान्सून पावसाची अनुभूती कोल्हापूरकरांनी घेतली.

पोलिसांचे हाल

कडक लॉकडाऊनच्या अंमलबजावणीसाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त रस्त्यांवर लावण्यात आला आहे. जोरदार वारे व पावसामुळे त्यांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागले.

पिकांचे नुकसान

वादळी पावसाने काढणीस आलेल्या उन्हाळी पिकांचे मोठे नुकसान केले. भात, नाचणी, भुईमूग, मका, कलिंगड पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. आडसाली ऊस ही जमिनी वर लोळला आहे.

मशागती खोळंबल्या

रोहिणी आणि मृगाचा पेरा साधण्यासाठी मशागत करण्यासाठी म्हणून शेतकरी शिवारात दिवस रात्र राबत आहे. गेले महिनाभर अधून मधून पडणाऱ्या वादळी पावसामुळे मशागतीची कामे ही सोपी झाली होती; पण आता जोरदार पावसामुळे शिवारात चिखल झाला आहे. मशागतीसाठी साधने आता चालणे शक्य नाही. दोन दिवसांत पाऊस थांबला तरच खोळंबलेल्या मशागती पुन्हा सुरू होणार आहेत.

पेरणीची तयारी सुरू

या वादळामुळे हा दोन- तीन दिवसांचा अपवाद वगळता हा संपूर्ण आठवडा पावसाचा असणार आहे. त्यामुळे ज्यांची मशागतीची कामे झाली आहेत, त्यांनी भाताची धुळवाफ पेरणीची तयारी सुरू केली आहे. पाऊस थांबला की आहे, त्या घातीवर पेरणी उरकण्याची जोडणी घालण्यात आली आहे. सोयाबीन व भुईमूग पेरणीलाही आता वेग येणार आहे.

Web Title: Heavy rains in Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.