कोल्हापुरात वळवाचा जोरदार पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:40 IST2021-05-05T04:40:02+5:302021-05-05T04:40:02+5:30
कोल्हापूर : कोल्हापूर शहर आणि जिल्ह्याच्या अनेक भागात मंगळवारी दुपारनंतर वळवाचा जोरदार पाऊस झाला. विजांचा लखलखाट, कडकडाट आणि जोरदार ...

कोल्हापुरात वळवाचा जोरदार पाऊस
कोल्हापूर : कोल्हापूर शहर आणि जिल्ह्याच्या अनेक भागात मंगळवारी दुपारनंतर वळवाचा जोरदार पाऊस झाला. विजांचा लखलखाट, कडकडाट आणि जोरदार वाऱ्यासह आलेल्या या पावसाने सुमारे पाऊण तास चांगलेच झाेडपून काढले. उष्म्याने हैराण झालेल्या कोल्हापूरकरांना त्यामुळे थोडा दिलासा मिळाला.
गेल्या दोन तीन दिवसांपासून कोल्हापूर शहरात कमालीचा उष्मा जाणवत होता. मंगळवारी दिवसभर त्यात अधिकच भर पडली होती. कडाक्याच्या उन्हाने अंगाची काहिली होत होती. त्यामुळे सायंकाळनंतर पाऊस येईल, अशी शंका होती. दुपारी साडेतीननंतर तर पश्चिमेकडून पूर्वेकडे काळे ढग दाटून आले आणि बघता बघता पावणेचार वाजता जोरदार पावसाला सुरुवात झाली.
शहराच्या सर्वच भागात जोरदार पाऊस झाला. आधी जोरदार वारे सुटले. विजांचा लखलखाट आणि कडकडाट सुरू झाला. सुमारे पाऊण तास जोरदार पावसाने शहराला झोडपले. उन्हाने तापलेल्या जमिनीवर पावसाचे पाणी पडताच त्याचा दर्प सुखावणारा होता. या जोरदार पावसाने शहराच्या रस्त्यावरून, रस्त्याच्या कडेला असलेल्या गटारीतून पाणी वहायला लागले, सखल भागात तर पाणीच पाणी झाले. काही ठिकाणी गटारी, चॅनेल तुंबल्याने त्यातील सांडपाणी रस्त्यावर आले.
बिंदू चौकालगतच्या शहरातील बागवान गल्ली, महात गल्ली येथे रस्त्यावरून पावसाच्या पाण्याचे लोट वाहायला लागले. काही घरात पाणी शिरले. त्यामुळे नागरिकांची एकच धावपळ उडाली. या पावसामुळे रस्ते अचानक ओस पडले. पाऊण तास शहरातील जीनजीवन विस्कळीत झाले. या दरम्यान विद्युत पुरवठाही खंडित झाला.
शहराबरोबरच शहरालगतच्या करवीर, राधानगरी, शाहूवाडी तालुक्यातही जोरदार पाऊस पाऊस झाला. ग्रामीण भागातही विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. या पावसामुळे उष्म्याने हैराण झालेल्या नागरिकांना थोडासा दिलासा मिळाला.