काेल्हापूर जिल्ह्यात जोरदार पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:14 IST2021-01-08T05:14:36+5:302021-01-08T05:14:36+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : काेल्हापूर जिल्ह्यात मंगळवारी जोरदार पाऊस झाला. दिवसभर उघडझाप राहिली असली तरी ढगाळ हवामान कायम ...

काेल्हापूर जिल्ह्यात जोरदार पाऊस
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : काेल्हापूर जिल्ह्यात मंगळवारी जोरदार पाऊस झाला. दिवसभर उघडझाप राहिली असली तरी ढगाळ हवामान कायम राहिले. अवकाळी पावसाने भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले असून गुऱ्हाळघरे, साखर कारखान्यांची ऊस तोडणीची कामे ठप्प झाली आहेत.
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने गेले दोन दिवस महाराष्ट्रात हवामानात बदल झाला आहे. सोमवारी दिवसभर ढगाळ हवामानासह काही ठिकाणी जोरदार पाऊस कोसळला. मंगळवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरणासह पाऊस सुरू झाला. साधारणता तासभर पाऊस झाल्यानंतर काहीशी उसंत घेतली. दहानंतर सूर्यनारायणाने दर्शन दिले; पण त्यानंतर पुन्हा ढगाळ वातावरणासह आकाश गच्च झाले.
अवकाळी पावसाने भाजीपाल्यासह रब्बी पिकांचे नुकसान झाले आहे. ढगाळ वातावरणामुळे किडीचा प्रादुर्भाव वाढणार आहे. रब्बी पिकाला थंडीची गरज असते, मात्र थंडी गायब होऊन पाऊस सुरू झाल्याने वाढीवर परिणाम होणार आहे. पावसामुळे गुऱ्हाळघरांच्या चिमण्या थंडावल्या आहेत. ऊसतोड थांबली आहेच, त्यात जळण भिजत असल्याने गुऱ्हाळघरे बंद आहेत. विटा भिजल्याने व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
आंबे मोहराला फटका
आंब्याला मोहर आला आहे, पण ढगाळ वातावरण आणि त्यात पाऊस होत असल्याने मोहराला फटका बसणार आहे. मोहर गळती लागणार असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
उसाची वाहने आडकली
साखर कारखान्यांचा हंगाम सुरू आहे, गेले दोन दिवस पाऊस सुरू असल्याने ऊस वाहतूक करणारी वाहने शेतात आडकली जात आहेत. त्यामुळे ऊस तोडणी थांबली असून रस्त्यालगतचे उसाचे प्लॉट तोडले जात आहेत.