धरणांच्या पाणलोटसह गगनबावड्यात मुसळधार पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:23 IST2021-09-13T04:23:02+5:302021-09-13T04:23:02+5:30

कोल्हापूर : थांबून थांबून रिपरिप पडणाऱ्या पावसाने रविवारपासून पुन्हा जोर धरला आहे. एकट्या गगनबावडा तालुक्यात ७६ मिलिमीटर इतका ...

Heavy rains in Gaganbawda with dam catchment | धरणांच्या पाणलोटसह गगनबावड्यात मुसळधार पाऊस

धरणांच्या पाणलोटसह गगनबावड्यात मुसळधार पाऊस

कोल्हापूर : थांबून थांबून रिपरिप पडणाऱ्या पावसाने रविवारपासून पुन्हा जोर धरला आहे. एकट्या गगनबावडा तालुक्यात ७६ मिलिमीटर इतका उच्चांकी पाऊस झाला असून, धरणांच्या पाणलाेट क्षेत्रातही पावसाचा जोर कायम आहे. लाल भडक पाण्याने नद्या काठोकाठ भरल्या असून, जोर असाच राहिल्यास पाणी पात्राबाहेर पडण्याची शक्यता आहे. मुसळधार पावसामुळे राधानगरीचा तीन क्रमांकाचा स्वयंचलित दरवाजा खुला असून, त्यातून २८०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग भोगावती नदीत होत आहे.

गेल्या आठवडाभरापासून जिल्ह्यात पावसाची उघडझाप सुरूच आहे. रविवारी मध्यरात्रीपासून जोर वाढला. दिवसभर पाऊस सुरूच होता. शहरात संध्याकाळी काहीशी पावसाने उघडीप घेतली. दिवसभर थांबून थांबून सरी कोसळत राहिल्याने घरोघरी पावसात भिजतच गौरीचे आगमन झाले. दरम्यान कमी दाबाचे क्षेत्र पुन्हा सक्रिय झाल्याने पाऊस जोर धरणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पुढील चार दिवस मुसळधार पावसाचे असतील असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे.

दरम्यान, पावसाचा जोर वाढल्याने शेतकरीही आनंदला आहे. भात पीक पोटरीत असल्याने पाण्याची गरज होती. कमी पावसामुळे करपा, तांबेऱ्याचे प्रमाण वाढले होते. पाऊस कमी असल्याने उसाच्या वाढीवरही परिणाम झाला आहे. ही एक बाजू सुखावह असली तरी सोयाबीन उत्पादक शेतकरी मात्र हबकले आहेत. पावसाची संततधार सुरु राहिल्यास कापणीस आलेला सोयाबीन मळायचा कुठे असा प्रश्न उभा ठाकला आहे.

चौकट

सरासरी १६ मि.मि पाऊस

जिल्ह्यात सरासरी १६. १ मि.मि. पावसाची नाेंद झाली आहे. गगनबावड्यात सर्वाधिक ७६.४ मि.मि. पावसाची नाेंद झाली आहे. शाहूवाडीत ४१, पन्हाळा २७.२, चंदगड २४.९, आजरा १७.४, राधानगरी १६.२, भूदरगड १३.६, गडहिंग्लज १०.९, करवीर ८, कागल ७ मिलिमीटर असा पाऊस गेल्या चोवीस तासात नाेंदवला गेला आहे.

चौकट

१४ बंधारे पाण्याखाली

पंचगंगा : शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड, शिरोळ

भोगावती : हळदी, सरकारी कोगे, खडक कोगे

वारणा : चिंचोली, माणगाव

कासारी : यवलूज, ठाणे आळवे

चौकट

धरणातून विसर्ग वाढला

पाटगाव, चिकोत्रा वगळता सर्व धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. राधानगरी धरणातून २८२८ क्यूसेक विसर्ग सुरू आहे. तुळशी ५०७, वारणा २८०६, काळम्मावाडी ४५००, कासारी ७५०, कडवी ८४५, कुंभी ३५०, चित्री ५३१, जंगमहट्टी १००, घटप्रभा ४०४३, जांबरे ४२७, आंबेओहळ २९, कोदे ७४३ क्यूसेक असा विसर्ग सुरू असल्याने नद्यांच्या पाणी पातळीतही वाढ होऊ लागली आहे.

Web Title: Heavy rains in Gaganbawda with dam catchment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.