आजऱ्यात सलग तिस-या दिवशीही मुसळधार पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:17 IST2021-06-19T04:17:51+5:302021-06-19T04:17:51+5:30
आजरा : आजरा तालुक्यात सलग तिस-या दिवशीही मुसळधार पाऊस सुरूच आहे. तालुक्यातील एरंडोळ व धनगरवाडी धरण भरले असून धरणातून ...

आजऱ्यात सलग तिस-या दिवशीही मुसळधार पाऊस
आजरा : आजरा तालुक्यात सलग तिस-या दिवशीही मुसळधार पाऊस सुरूच आहे. तालुक्यातील एरंडोळ व धनगरवाडी धरण भरले असून धरणातून १२५ क्युसेकने सांडव्यातून विसर्ग सुरू आहे. चित्री धरण ५० टक्के भरले आहे. पावसाने सहा जणांच्या राहत्या घराच्या भिंती पडून ५५ हजारांचे पोळगाव येथील बाळू तेजम यांच्या घरात रस्त्यावरील व गटारीचे पाणी घुसल्याने २० पोती भात भिजले आहे. हिरण्यकेशी व चित्रा नदी धोक्याच्या पातळीवर बाहेरून आजही वाहत आहे.
मृग नक्षत्रात पडलेल्या पावसाने तालुक्यातील धनगरवाडी व एरंडोळ धरण पहिल्या टप्प्यातच भरले आहे. चित्री धरणात ९४० द.ल.घ.फू. म्हणजे ५० टक्के पाणीसाठा तर खानापूर धरणात ३४ टक्के पाणीसाठा झाला आहे. सलग तिस-या दिवशी तालुक्यात मुसळधार पाऊस सुरूच आहे. आज सकाळी ८ पर्यंत आजरा ९२, गवसे ९२, मलिग्रे ६८, उत्तूर ५२ तर सरासरी ७६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. पावसाने तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुसळधार पडणा-या पावसाने भात कोळपणी व पेरणीची कामे ठप्प झाली आहेत.
पावसाने पेंढारवाडी येथील शेवंता लोखंडे, चिमणे येथील हौसाबाई हुंचाळे, लता देसाई (उचंगी), बंडू कांबळे (उचंगी), सखाराम कोळेकर (उचंगी), नारायण लोखंडे (पेरणोली) यांच्या राहत्या घराच्या भिंती पडून ५५ हजारांचे नुकसान झाले आहे. पोळगाव येथील बाळू तेजम यांच्या घरात गटारीचे व रस्त्याचे पाणी घुसल्याने ५० पोती भात भिजला आहे. अखेर ग्रामपंचायत प्रशासनाला रस्ता फोडून घरातील पाणी बाहेर काढावे लागले.