कोल्हापूर : राधानगरीसह अनेक ठिकाणी मंगळवारी सायंकाळी जोरदार पाऊस झाला. कोल्हापूर शहरात दिवसभर ढगाळ वातावरण राहिले, येथेही चांगला पाऊस होईल असे वाटत असतानाच हलक्या सरी कोसळल्या.गेल्या दोन दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात वातावरणात बदल झाला आहे. सोमवारी रात्री जिल्ह्यात अनेक ठिकाणी हलका ते जोरदार सरी कोसळल्या होत्या. जरी पाऊस झाला असला तरी उष्म्यात वाढ होत गेली आहे. मंगळवारी सकाळपासून आकाश गच्च होते. उन्हाची तीव्रता कमी असली तरी वातावरणात उष्मा कमालीचा होता.
दिवसभर ढगाळ वातावरण राहिले आणि सायंकाळी चार वाजता सोसाट्याच्या वाऱ्यासह राधानगरी, शाहूवाडी, आजरांसह अनेक ठिकाणी जोरदार पाऊस कोसळला. मेघगर्जनेसह सुमारे अर्धा ते पाऊणतास एकसारखे पावसाने झोडपून काढले.कोल्हापूर शहरात वारे वाहू लागल्याने जोरदार पावसाची शक्यता होती. मेघगर्जना ही झाली, पण केवळ हलक्या सरी कोसळल्या. उष्म्याने हैराण झालेल्या नागरिकांना थोडासा सुखद गारवा मिळाला असला तरी पाऊस थांबल्यानंतर पुन्हा उष्मा वाढला.
दोन दिवस पावसाचे..आगामी दोन दिवस जिल्ह्यात हकला ते जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. कमाल तापमान ३७ डिग्रीपर्यंत खाली आले असले तरी किमान तापमानातील वाढ चिंताजनक आहे.
शेतीला पूरक..वळीवाचा पाऊस शेतीला पूरक आहे. ऊसासह उन्हाळी भुईमूग, मक्यासाठी पाऊस चांगला आहे. वेलवर्गीय पिकांना या पावसाचा काहीसा फटका बसू शकतो.