इचलकरंजीत दमदार पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:17 IST2021-07-22T04:17:17+5:302021-07-22T04:17:17+5:30
लहान पूल वाहतुकीसाठी बंद सततच्या पावसाने पातळीत वाढ सुरूच लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : शहर व परिसरात गेल्या चार ...

इचलकरंजीत दमदार पाऊस
लहान पूल वाहतुकीसाठी बंद
सततच्या पावसाने पातळीत वाढ सुरूच
लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : शहर व परिसरात गेल्या चार दिवसांपासून पावसाने जोर धरला आहे. तसेच पाणलोट क्षेत्रात सुरू असलेला पाऊस आणि धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग यामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. बुधवारी पंचगंगा नदीच्या पाण्याची पातळी ५७ फुटांवर गेली आहे. त्यामुळे लहान पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
शहर व परिसरात मागील काही दिवसांत पावसाने विश्रांती घेतली होती. परंतु गेल्या चार दिवसांपासून पावसाने पुन्हा हजेरी लावली आहे. त्याचबरोबर धरण पाणलोट क्षेत्रात सतत सुरू असलेल्या पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात वाढ होत असल्याने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. राधानगरी, कोयना, चांदोली धरणातून सुरू असलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. मंगळवारी (दि.२०) सायंकाळी सहा वाजता पाणीपातळी ५६.६ फुटांवर पोहोचली होती. पाणी पातळीत सातत्याने वाढ होत असल्याने ५७ फुटांवर पोहोचली. पाणीपातळीत वाढ होत असल्याने नदीकाठावरील भागात पाणी पसरू लागल्याने पुराची स्थिती निर्माण होऊ लागली आहे. पंचगंगा नदीची इशारा पातळी ६८ फुटांवर, तर धोका पातळी ७१ फुटांवर आहे. हवामान खात्याने मंगळवारपासून पाऊस सक्रिय होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता असल्याने रेड अलर्टचा इशारा दिला आहे. नगरपालिकेचे आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.
फोटो ओळी
२१०७२०२१-आयसीएच-०४
पावसाचा जोर वाढल्याने पाणी लहान पुलाला घासत आहे.
२१०७२०२१-आयसीएच-०५
लहान पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
(सर्व छाया-उत्तम पाटील)