गगनबावड्यात धुवाधार पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:28 IST2021-07-14T04:28:53+5:302021-07-14T04:28:53+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : जिल्ह्यात सोमवारी पावसाचा जोर काहीसा राहिला आहे. गगनबावडा तालुक्यात धुवाधार पाऊस सुरू असून चोवीस ...

गगनबावड्यात धुवाधार पाऊस
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : जिल्ह्यात सोमवारी पावसाचा जोर काहीसा राहिला आहे. गगनबावडा तालुक्यात धुवाधार पाऊस सुरू असून चोवीस तासांत ११०.८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. धरणक्षेत्रातही चांगला पाऊस सुरू असून, नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. पंचगंगा नदीवरील ‘राजाराम’ बंधारा पाण्याखाली गेला आहे. शिवारात पाणी झाल्याने खोळंबलेल्या रोप लागणीला आता गती आली आहे.
गेल्या दोन-तीन दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात मान्सून सक्रिय झाला आहे. पावसाला ताकद लागत नसली तरी अधूनमधून हलक्या सरी कोसळत राहिल्याने खरीप पिकांना जीवदान मिळाले होते. रविवारी रात्रीपासून जिल्ह्यात पावसाने काहीसा जोर पकडला. रात्रभर अनेक ठिकाणी जोरदार सरी कोसळल्या. गगनबावडा तालुक्यात तर ढग फुटीसारखा पाऊस झाला. चोवीस तासांत ११०.८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. राधानगरी, शाहूवाडी, करवीर, भुदरगड, आजरा, चंदगड व पन्हाळा तालुक्यांतही पाऊस चांगला सुरू आहे. कोल्हापूर शहरातही जोरदार चांगला पाऊस झाल्याने सखल भागात पाणी साचले आहे.
धरणक्षेत्रातही जोरदार पाऊस असल्याने नद्यांच्या पातळीत वाढ होत आहे. सोमवारी सायंकाळी पंचगंगा नदीची पातळी १६.८ फुटापर्यंत पाेहोचल्याने ‘राजाराम’ बंधारा पाण्याखाली गेला आहे. त्याशिवाय ‘इचलकरंजी’ व ‘रुई’ हे दोन बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
गेली पंधरा दिवस पावसाने दडी मारल्याने खोळंबलेल्या भात व नागलीच्या रोप लागणीला गती आली आहे. धरणक्षेत्रातही चांगला पाऊस सुरू असून नद्यांच्या पाणीपातळी वाढ होत आहे.
‘भोगावती’ पात्राबाहेर
जिल्ह्यातील नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. भोगावती नदीचे पाणी यंदा दुसऱ्यांदा बाहेर पडले आहे.
फोटो ओळी : कोल्हापूर शहरात सोमवारी पावसाच्या जोरदार सरी कोसळल्याने सखल भागात असे पाणी तुंबले होते. (फोटो-१२०७२०२१-कोल-रेन) (छाया- नसीर अत्तार)