तावडे हॉटेलप्रकरणी आज सुनावणी
By Admin | Updated: July 4, 2014 00:51 IST2014-07-04T00:44:09+5:302014-07-04T00:51:12+5:30
मिळकतधारकांच्या नजरा : अपेक्षित निकालानंतर लगेच कारवाईचे संकेत

तावडे हॉटेलप्रकरणी आज सुनावणी
कोल्हापूर : तावडे हॉटेल परिसरातील मिळकतधारकांनी आणखी पुरावे गोळा करण्यासाठी व कागदपत्रांसाठी मागितलेली मुदत मान्य करीत उच्च न्यायालयाने पुढे ढकललेली सुनावणी उद्या, शुक्रवारी होत आहे. २७ मे रोजी महापालिकेने राबविलेली अतिक्रमणाची कारवाई तात्पुरती ‘जैसे थे’ ठेवण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते. महापालिका प्रशासनाने कारवाईच्या माहितीसह प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. त्यामुळे न्यायालयाचा निकाल बाजूने लागल्यास ताबडतोब पुन्हा अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेण्यात येणार असल्याचे संकेत महापालिका सूत्रांनी दिले. महापालिकेने तावडे हॉटेल ते गांधीनगर दरम्यानच्या रस्त्यावरील हद्दीतील ना विकास झोन, ट्रक टर्मिनस व कचरा डेपो या जागांवरील अतिक्रमण हटविण्याची मोहीम २६ मे रोजी हाती घेतली होती. दीड दिवसांच्या कारवाईनंतर लगेच २७ मे रोजी उच्च न्यायालयाचे न्यायाधीश एम. एच. सोनक यांनी कारवाईला ‘जैसे थे’आदेश देऊन कारवाई थांबविण्याचे आदेश दिले. यानंतर १६ जूनच्या सुनावणीत उचगाव ग्रामपंचायतीने आणखी कागदपत्रे देण्यासाठी मुदत मागवून घेतली होती. त्यामुळे वादग्रस्त व बहुचर्चित ठरलेल्या या अतिक्रमण मोहिमेचा फैसला उद्या होणार असल्याने उत्सुकता आहे.