तासगाव कारखाना विक्रीप्रकरणी १९ मार्च रोजी सुनावणी
By Admin | Updated: March 9, 2015 23:48 IST2015-03-09T22:30:35+5:302015-03-09T23:48:01+5:30
मुंबई उच्च न्यायालयात याचिका : अवसायक व गणपती संघाच्या वेगवेगळ्या दाव्यांवर एकत्रच सुनावणी होणार...

तासगाव कारखाना विक्रीप्रकरणी १९ मार्च रोजी सुनावणी
भिलवडी : तासगाव तालुका सहकारी साखर कारखान्याच्या विक्र ीप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात अवसायकांनी दाखल केलेल्या याचिकेवर आज होणारी सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. दरम्यान, विक्री व्यवहारप्रकरणी गणपती जिल्हा संघाने स्वतंत्र याचिका दाखल केल्याने या दोन्हीही याचिकांवरील सुनावणी १९ मार्चला होणार असल्याचा निर्णय न्यायाधीश नरेश पाटील व गडकरी यांच्या खंडपीठाने आज दिला.याबाबत कारखान्याचे माजी कार्यकारी संचालक आर. डी. पाटील यांनी माहिती दिली. महाराष्ट्र राज्य सहकारी बॅँकेने कारखान्याची मालमत्ता गणपती जिल्हा संघास १४ कोटी ५१ लाखास विकली होती. पुणे येथील डी.आर.ए.टी. (ऋण वसुली अधिकरण) न्यायालयाने ही विक्री प्रक्रिया नियमबाह्य ठरवून विक्री व्यवहाराला स्थगिती दिली होती. परंतु गणपती संघाने ही स्थगिती उठविली होती. या निर्णयाविरोधात अवसायकांनी मुंबई डी.आर.ए.टी. न्यायालयात अपील दाखल केले होते. दरम्यानच्या काळात राज्य बॅँकेच्या प्रशासक मंडळाने विक्री व्यवहार कायदेशीर नसल्याने तो रद्द केला होता. तसे प्रतिज्ञापत्रही न्यायालयात दाखल केले होते. परंतु अपिलाच्या सुनावनीवेळी गणपती जिल्हा संघाने जोरदार विरोध करीत अवसायकांचे अपील फेटाळून लावले होते. तासगाव कारखान्याची मालमत्ता गणपती जिल्हा संघाच्या नावे करावी, अशी मागणी केली होती.
दरम्यान, डी.आर.ए.टी. न्यायालयाने कारखान्यावर राज्य बॅँकेच्या एकूण कर्जाच्या म्हणजे ६० कोटीच्या २५ टक्के रक्कम १५ कोटी रूपये आठ आठवड्यात जमा करण्याचे आदेश दिले होते. एवढी मोठी रक्कम भरू शकत नसल्याने अवसायकांनी डी.आर.ए.टी.च्या आदेशाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यामध्ये गेल्या आठ वर्षात राज्य बॅँकेकडे कारखाना भाडेपट्ट्याने दिलेपोटी १६ कोटी रूपये जमा झाले आहेत. कारखान्याची सर्व मालमत्ता बॅँकेच्या ताब्यात आहे. कारखान्याचा विक्री व्यवहार बेकायदेशीर आहे. यामध्ये कायद्याच्या तरतुदीचे पालन झाले नाही आदी मुद्यांचा समावेश आहे. या याचिकेवर आज, सुनावणी होणार होती. मात्र गणपती संघाने यासंदर्भात गेल्या महिन्यामध्ये स्वतंत्र याचिका दाखल केली होती. यामध्ये कारखान्याच्या नावे १०४ कोटीचे कर्ज असून अवसायकांकडून या रकमेच्या ५० टक्के रक्कम भरून घ्यावी, अशी मागणी केली होती. या दोन्ही याचिका एकत्रित सुनावणीसाठी घ्याव्यात असे म्हणणे दोन्हीही पक्षकारांकडून न्यायालयासमोर मांडले. यावेळी न्यायाधीश नरेश पाटील व गडकरी यांच्या खंडपीठाने दोन्ही याचिकांवर १९ मार्चला एकत्रित सुनावणी होणार असल्याचे जाहीर केले. (वार्ताहर)
कारखाना बळकाविण्यासाठी नवा डाव
अवसायकांची बाजू भक्कम असून त्यांच्या बाजूने निकाल होणार, हे वास्तव असताना देखील गणपती जिल्हा संघाने १०४ कोटी रूपये कर्ज असल्याचा कांगावा करून, अवसायकांना जादा रक्कम भरता येऊ नये व कारखान्याचा विक्र ी व्यवहार रद्द होऊ नये, तसेच कारखाना स्वत: गिळंकृत करण्यासाठी नवीन डाव खेळत असल्याचा आरोप माजी कार्यकारी संचालक आर. डी. पाटील यांनी केला.