टोप खणप्रकरणी आज हरित लवादाकडे सुनावणी
By Admin | Updated: July 21, 2014 00:23 IST2014-07-21T00:17:17+5:302014-07-21T00:23:39+5:30
सर्वांचे लक्ष लागून : कचराप्रश्न निकाली निघण्याची शक्यता

टोप खणप्रकरणी आज हरित लवादाकडे सुनावणी
कोल्हापूर : महापालिका आणि टोप ग्रामस्थ यांच्यातील टोप खण येथे कचरा टाकण्याबाबत उद्भवलेल्या परस्पर विरोधी तक्रारींवर उद्या, सोमवारी पुण्यातील हरित लवादाकडे सुनावणी होत आहे. हरित लवादाकडे निर्णयानंतर थेट सर्वोच्च न्यायालयातच आव्हान द्यावे लागणार आहे. त्यामुळे एकतर शहरातील कचरा प्रश्न कायमचा निकाली निघेल किंवा असाच भिजत पडण्याची शक्यता आहे. महापालिका प्रशासनाने शहरातील कचरा टोप खण किंवा इतरत्र हलविण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.
हरित लवादाकडील निर्णय सकारात्मक लागल्यास महापालिका निविदा काढून तत्काळ झूम प्रकल्पातील कचरा शास्त्रीय पद्धतीने टोप खणीत टाकून त्याचे निराकरण करणार आहे, तर प्रदूषण नियंत्रण मंडळाने हलसवडे-तामगाव परिसरातील एक खण कचरा टाकण्यासाठी देण्याची तयारी सुरू केली असल्याचे समजते. झूम प्रकल्पातील कचरा उठावाची प्राथमिक तयारी महापालिकेने सुरू केली असून, झूममधील कचरा टोप, टाकाळा खण किंवा हलसवडे येथे टाकला जाणार आहे. यासाठी मागील आठवड्यातच निविदा काढून भाडेतत्त्वावर वाहने घेण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे.
शहरात दररोज किमान दीडशे टन कचरा निर्माण होतो. हा कचरा टाकण्यासाठी महापालिकेकडे जागा उपलब्ध नाही. टोप येथील खणीचा मार्ग मोकळा झाल्यास शहराचा पुढील किमान ५० वर्षांचा कचऱ्याचा प्रश्न निकाली निघणार आहे. टोप खणीचा प्रश्न मिटेपर्यंत महापालिकेने टाकाळा खण येथे शास्त्रीय पद्धतीने कचऱ्याचे शुद्धिकरण करून उर्वरित कचऱ्याचे घटक टाकण्यासाठी जागा करण्याची तयारी सुरू केली आहे. त्यापूर्वी झूम प्रकल्पात चाळणीसह इतर यांत्रिक उपकरणे लावण्यासाठी जागा करावी लागणार आहे. झूममधील कचरा हटवून जागा रिकामी करण्यासाठी तात्पूर्ती पर्यायी जागा महापालिकेकडे नाही. पुण्यातील एका कंपनीला कचऱ्यापासून वीजनिर्मिती करण्याचा ठेका देण्याची प्रक्रिया अद्याप सुरू झालेली नाही. महापालिका सभागृहाने या प्रकल्पास मंजुरी देऊन तब्बल नऊ महिने उलटले. जागा नसल्याने हा प्रकल्प रखडला आहे. कचरा प्रश्न निकाली काढण्यासाठी महापालिका येत्या काही महिन्यांत ठोस निर्णय घेणार आहे. हरित लवादाच्या निकालानंतरच शहरातील कचऱ्याचे भवितव्य अवलंबून आहे. (प्रतिनिधी)