कोपार्डे - कोल्हापूर जिल्हा परिषद आरोग्य समितीने आरोग्य उपकेंद्रात येणाऱ्या रुग्णांसाठी केसपेपर फी पाच रुपये करण्याचा निर्णय घेतला आहे. आता सर्वसामान्यांना मोफत मिळणाऱ्या जिल्हा परिषदेच्या जुजबी आरोग्य सेवेसाठी पैसे मोजावे लागणार आहेत. या पाच रुपये फीने जिल्हा परिषद आरोग्य विभागाला किती हातभार लागणार आहे, असा प्रश्न ग्रामीण भागातील जनतेतून विचारला जात आहे.
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागातील जनतेला आरोग्यसेवा देण्याकरिता शासनाने ३८० समुदाय आरोग्य अधिकारी नेमण्याचे सूचित केले आहे. त्याप्रमाणे ३७२ समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांची उपकेंद्र स्तरावर नेमणूक झाली आहे. त्यांच्याकडून नियमित उपकेंद्रांमध्ये ओपीडी सुरू होणार आहे. या उपकेंद्रांमध्ये केस पेपर फी ही पाच रुपयेप्रमाणे आकारण्यात यावी, असा ठराव जिल्हा परिषद आरोग्य समितीने मंजूर केला आहे. यापुढे उपकेंद्रात उपचारासाठी जाणाऱ्या प्रत्येक रुग्णाला पैसे मोजावे लागणार आहेत.
या केसपेपरमधून जमणारा निधी साप्ताहिक उपकेंद्र बळकटीकरण खात्यामध्ये आठवड्यातून एकवेळ जमा करण्यात येणार असून, या खर्चाचा ताळमेळ करून त्याची नोंद रोज कीर्दमध्ये करण्यात येणार आहे. केंद्र स्तरावरील एकत्रित निधी आवश्यकतेनुसार वीजबिल, पाणीपट्टी तसेच आवश्यक औषधे व साहित्य इत्यादीकरिता ग्राम आरोग्य समितीच्या परवानगीने खर्च करण्यात येणार आहे. केसपेपरची तात्पुरत्या स्वरूपात प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावरील उपलब्ध निधीमधून तत्काळ छपाई करून समुदाय आरोग्य अधिकारी यांना उपकेंद्र स्तरावर उपलब्ध करून देत कामकाज करण्यात यावे, असे आदेश दिले आहेत.