आरोग्य योजना अडकली खाबुगिरीत : रुग्णांची होत आहे राजरोस लूट; मूळ हेतूलाच हरताळ
By Admin | Updated: August 25, 2014 00:20 IST2014-08-25T00:19:47+5:302014-08-25T00:20:22+5:30
‘प्राथमिक कागदपत्रे न पाहताच हे योजनेत बसत नाही’ असे सांगत ‘हबकी’ डाव टाकून पैसे उकळण्यासाठी पहिला फासा टाकला जातो आणि येथूनच एजंटगिरीचा श्रीगणेश होतो.

आरोग्य योजना अडकली खाबुगिरीत : रुग्णांची होत आहे राजरोस लूट; मूळ हेतूलाच हरताळ
संतोष पाटील - कोल्हापूर -‘साहेब... राजीव गांधी योजनेतनं आॅपरेशन करायचं हाय, व्हईल न्हवं?’ अशी मोठ्या आशेने व करुण स्वरात दररोज शेकडो रुग्ण व त्यांचे नातेवाईक आर्त विनविण्या करीत जीवनदायी योजनेच्या ‘आरोग्य मित्रा’कडे उपचाराचे साकडे घालतात. विनवणी करणारा याचक अन् आपण दाता असल्याच्या भूमिकेतून रुग्णांना माहिती दिली जाते. ‘प्राथमिक कागदपत्रे न पाहताच हे योजनेत बसत नाही’ असे सांगत ‘हबकी’ डाव टाकून पैसे उकळण्यासाठी पहिला फासा टाकला जातो आणि येथूनच एजंटगिरीचा श्रीगणेश होतो.
आरोग्यपूर्ण जीवनाची हमी देणाऱ्या योजनेचा मुळापासूनच पुनर्आढावा घेण्यासारखीच सद्य:स्थिती आहे. एकूण लोकसंख्येच्या ९० टक्के जनतेच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेकडे काही रुग्णालये वरकमाईचे साधन म्हणून पाहू लागली आहेत. योजनेत दीड लाखापर्यंतच्या ९७२ प्रकारच्या शस्त्रक्रिया सर्व सरकारी व खासगी रुग्णालयांत मोफत केल्या जातात. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासाठी ‘ड्रीम प्रोजेक्ट’ असणाऱ्या या योजनेला खाबुगिरीने पोखरल्याची सद्य:स्थिती आहे. (क्रमश:)
एक लाखापेक्षा कमी एकत्रित वार्षिक उत्पन्न असणारी कुटुंबे, तसेच पांढरे शिधापत्रिकाधारक वगळता सर्व शिधापत्रिकाधारक कुटुंबे या योजनेसाठी पात्र आहेत. लाभार्थी कुटुंबांना विशेष ओळखपत्र देऊन लाभार्थी ठरविण्यात येते. या योजनेत जिल्ह्यातील २६ लाखांहून अधिक नागरिक पात्र आहेत. मात्र, योजनेची मूळ माहिती व गांभीर्य नसल्यानेच ही योजना केवळ कागद रंगवून पैसे खाण्याचे कुरण बनली आहे.
या योजनेत सर्व शासकीय, खासगी तसेच धर्मादाय संस्था रुग्णालयांचा सहभाग आहे. जिल्ह्यातील २८ मोजकी रुग्णालये या योजनेत सहभागी आहेत. तसेच लाभार्थ्याला त्याच्या मर्जीनुसार नोंदविलेल्या कोणत्याही रुग्णालयात उपचार घेण्याची मुभा आहे. हर्निया, डायलेसिस, कर्करोग, मेंदूचे विकार, मूतखडा, बायपास, हृदय शस्त्रक्रिया, हाडांचे प्रत्यारोपण, अपघातातील दुखापत, आतड्यांचे विकार आदी ९७२ आजार व त्याच प्रकारांच्या शस्त्रक्रिया तसेच १२१ पाठपुरावा सेवांचा लाभ घेता येतो.
या योजनेतील लाभार्थ्यांचा ३६८ रुपयांचा विम्याचा हप्ता शासनातर्फे भरला जातो. लाभार्र्थ्यांंना प्रतिवर्षी दीड लाखापर्यंतचे विमा संरक्षण तसेच मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी २ लाख ५० हजारांपर्यंत मर्यादा आहे. कुटुंबातील व्यक्तीसाठी एका वर्षासाठी या योजनेचा लाभ घेता येतो.