कुरुंदवाड : शहराच्या विकासासाठी आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी पाच कोटी रुपयांचा निधी देण्याचे आश्वासन दिले होते. त्यातील पहिला टप्पा म्हणून दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. उर्वरित रक्कम मार्चअखेरपर्यंत मिळणार असल्याची माहिती पालिकेतील विरोधी पक्षनेते, माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे व पाणीपुरवठा सभापती जवाहर पाटील यांनी पत्रकारांना दिली. ते म्हणाले, पालिकेत काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता आहे. सत्ताधारी आघाडीचे नेतृत्व नगराध्यक्ष जयराम पाटील करत आहेत. मात्र गेल्या चार वर्षांत नव्याने निधी आणून शहराचा विकास करण्यात अपयशी ठरले आहेत. शिवाय या आधीच्या सभागृहाने मंजूर केलेली कामेही करू शकले नाहीत. त्यामुळे सत्ताधारी गटातील नगरसेवक नाराज असल्याने विरोधी व नाराज नगरसेवकांची शहर बचाव कृती समितीच्या माध्यमातून एकत्रित मूठ बांधून मंत्री यड्रावकर यांची दोन महिन्यांपूर्वी भेट घेतली होती. मंत्री यड्रावकर यांनी शहराच्या विकासासाठी पाच कोटींचा निधी देण्याचे आश्वासन दिले होते. या आश्वासित निधीपैकी दोन कोटी रुपयाच्या निधीला प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. त्यासाठी कामाचा प्रस्ताव देऊन त्वरित कामाला सुरुवात करणार असल्याची माहिती डांगे यांनी दिली.
यावेळी शकील गरगरे, नगरसेवक अक्षय आलासे, उदय डांगे, फारुख जमादार, नगरसेविका समरीन गरगरे, अनुप मधाळे, किरण जोंग, अक्षय आलासे आदी उपस्थित होते.