आरोग्य ‘मित्र’ कुठले; सर्वसामांन्यांना लुटणारे एजंटच- ‘जीवनदायी’ नव्हे..... वेदनादायी - भाग २

By Admin | Updated: August 25, 2014 23:49 IST2014-08-25T23:43:44+5:302014-08-25T23:49:34+5:30

रुग्णांना चुकीचा सल्ला: लाभार्थ्यांवर तीस ते चाळीस टक्के रक्कम कपात करुन उपचार

Health 'friend' where; Agent Looters - Not Lives - Painful - Part 2 | आरोग्य ‘मित्र’ कुठले; सर्वसामांन्यांना लुटणारे एजंटच- ‘जीवनदायी’ नव्हे..... वेदनादायी - भाग २

आरोग्य ‘मित्र’ कुठले; सर्वसामांन्यांना लुटणारे एजंटच- ‘जीवनदायी’ नव्हे..... वेदनादायी - भाग २

संतोष पाटील - कोल्हापूर--राजीव गांधी जीवनदायी योजनेत नोंदणीकृत रुग्णालयात आठवड्याचे सातही दिवस चोवीस तास आरोग्यमित्र लाभार्थ्यांच्या मदतीसाठी उपलब्ध आहेत. रुग्णावर उपचार करताना साहाय्य करण्यासाठीच त्यांची नेमणूक आहे. आरोग्यमित्राचे वेतन व नेमणूक राज्य शासनातर्फे केली जाते. मात्र, अनेक आरोग्यमित्रच एजंट म्हणून काम करू लागल्याने या योजनेला घरघर लागली आहे.
दररोज दोन हजार तक्रारींचे निवारण करण्याची क्षमता असणाऱ्या अत्याधुनिक कॉलसेंटरच्या मदतीने २४ तास लोकांच्या शंकांचे समाधान केले जाईल, अशी घोषणा राज्य शासनाने केली होती. मात्र, तक्रारदारास संबंधितापर्यंत पोहोचू दिले जात नाही. या सर्व प्रकारात आरोग्यमित्रांची भूमिकाच संशयास्पद आहे. येणाऱ्या रुग्णांना मदत करून योजनेचा लाभ मिळवून देण्याच्या मुख्य उद्देशाला हरताळ फासत, रुग्ण वैद्यकीय दुकानदारीच्या कचाट्यात कसा आडकेल यासाठीच हे आरोग्यमित्र काम करीत असल्याचा संशय यावा अशीच परिस्थिती आहे.
योजनेच्या लाभार्थ्यासाठी एप्रिल २०१३ पूर्वीचे केशरी रेशनकार्ड, ओळखपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान ओळखपत्र, आदी अत्यंत सोप्या कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक आहे. मात्र, कागदपत्रांची किचकट प्रक्रिया असल्याचे भासवत अनेकांना योजनेपासून वंचित ठेवण्याचे पाप काही आरोग्यमित्रच करीत असल्याचा अनुभव अनेक रुग्णांना येत आहे.
‘योजनेत उपचार होणे अशक्य आहे’ अशा आरोग्यमित्राच्या सल्ल्यानंतर हबक लेले रुग्ण वैद्यकीय उपचारासाठी ते सांगतील त्याच रुग्णालयाचा आधार घेतात. संबंधित रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी उपचाराचा खर्च सांगतात. आकडा ऐकून घाम पुसणाऱ्या रुग्णाला ‘आम्ही यातील ३० ते ४० टक्के रक्कम कमी करतो. आपल्याकडील कागदपत्रे सादर करा’, असा सल्ला दिला जातो. किमान काही कपात करून का असेना उपचार होतोय या आनंदात रुग्णाचे नातेवाईकही खुशीने कागदपत्रांसह मागणीप्रमाणे रक्कम देऊन उपचार करतात. मात्र, रकमेत सूट दिलेल्या रुग्णांची कागदपत्रे रंगवून त्यास योजनेचा लाभार्थी बनविले जाते. शासनाकडून सर्व उपचाराचे पैसे उकळले जातात. अनेक रुग्णालयांत हा धंदा सध्या तेजीत सुरू आहे.
(क्रमश:)

लूट ही ठरलेलीच
सुरुवातीस योजनेत उपचार होऊ शकत नाहीत, असे सांगत झिडकारणारे नंतर आम्ही ‘अ‍ॅडजस्ट’ करतो असे म्हणत रुग्णालयाच्या नेहमीच्या बिलात काही रक्कम सूट देत उपचार कसे करतात? अर्धी किंवा त्याहून अधिकची रक्कम भरल्यानंतर योजनेला सुरुवातीस अपात्र असणारा रुग्ण पात्र कसा होतो? मोफत उपचारानंतर पात्र रुग्णांकडून रुग्णालयाच्या मदतीसाठी काही तरी रक्कम द्या, अशी विनवणी करून लुटीचे प्रकार घडतच आहेत.
कुठे मिळते हेल्थ कार्ड..
महासेवा केंद्र, पोस्ट कार्यालय, ग्रामपंचायत कार्यालयात केशरी रेशन कार्ड व ओळखपत्र सादर केल्यास दहा मिनिटांत मोफत योजनेतील लाभार्थ्यांना हेल्थ कार्ड दिले जाते. लाभार्थ्यांना याची माहितीच नसल्याने योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी एजंटांचा सुळसुळाट झाला आहे.
पैसे देण्यास टाळाटाळ
गेल्या आठवड्यात राजारामपुरीतील मेंदूच्या विकारासाठी प्रसिद्ध असणाऱ्या एका रुग्णालयात भरारी पथक येणार असल्याची माहिती अगोदरच देण्यात आली. आईच्या मेंदूच्या विकाराचे या रुग्णालयात उपचार सुरू होते. सुरुवातीस २५ हजारांची रक्कम घेऊनच उपचार सुरू केले. तगादा लावताच योजनेअंतर्गत शस्त्रक्रिया होऊनही रुग्णालयातील व्यवस्थापन पैसे देण्यास टाळाटाळ करीत आहे. - विष्णू महाडिक, लाभाथी

Web Title: Health 'friend' where; Agent Looters - Not Lives - Painful - Part 2

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.