आरोग्य विभागाच्या परीक्षा रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:26 IST2021-09-25T04:26:20+5:302021-09-25T04:26:20+5:30
आरोग्य विभागाने ही परीक्षा घेण्याची जबाबदारी खासगी कंपनीकडे दिली होती. सर्व परीक्षा प्रक्रिया पार पाडून थेट गुणवत्ता यादी काढून ...

आरोग्य विभागाच्या परीक्षा रद्द
आरोग्य विभागाने ही परीक्षा घेण्याची जबाबदारी खासगी कंपनीकडे दिली होती. सर्व परीक्षा प्रक्रिया पार पाडून थेट गुणवत्ता यादी काढून दिल्यानंतर केवळ आदेश देण्याचे काम आरोग्य विभागासाठी शिल्लक ठेवले होते; मात्र या परीक्षेच्या हॉल तिकिटापासून ते केंद्र देण्यापर्यंत अनेक बाबतीत झालेले घोळ उघडकीस आले. याबद्दल थेट आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडेच राज्यभरातून तक्रारी झाल्या होत्या. अखेर त्यांनी या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला.
‘क’ वर्गाची शनिवारी तर ‘ड’ वर्ग कर्मचाऱ्यांसाठीची परीक्षा रविवारी घेण्यात येणार होती; परंतु आता ही परीक्षाच रद्द झाल्याने प्रचंड संख्येने उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांना मोठ्या मनस्तापाला सामाेरे जावे लागले आहे.
चौकट
कोकणातील परीक्षार्थी कोल्हापुरात दाखल
‘क’ वर्गाची परीक्षा रत्नागिरी जिल्ह्यात ठेवण्यात आलेली नव्हती. त्यांना कोल्हापूरसह अन्य काही ठिकाणी केंद्र देण्यात आली होती. शनिवारी सकाळी पेपर असल्याने यातील अनेक जण कोल्हापुरातही दाखल झाल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे या सर्वांनाच या निर्णयाचा फटका बसला आहे.
कोट
आरोग्य विभागाची ही परीक्षा खासगी कंपनीतर्फे घेतली जाणार होती; परंतु रात्री पावणे अकरा वाजताच्या सुमारास ही परीक्षा पुढे ढकलली असल्याचा अधिकृत विभागाचा संदेश आला आहे.
डाॅ. अनिल माळी
प्रभारी उपसंचालक, आरोग्य विभाग कोल्हापूर.