कोतोलीत इच्छुकांच्या गर्दीने नेत्यांची डोकेदुखी
By Admin | Updated: January 17, 2017 00:21 IST2017-01-17T00:21:50+5:302017-01-17T00:21:50+5:30
शिवसेना-जनसुराज्य विरुद्धच काटा लढत : वीस वर्षांनंतर मतदारसंघ सर्वसाधारण पुरुष वर्गासाठी खुला झाल्याने अनेकांची तयारी

कोतोलीत इच्छुकांच्या गर्दीने नेत्यांची डोकेदुखी
पांडुरंग फिरंगे ल्ल कोतोली
गेली २० वर्षे आरक्षित असलेला कोतोली जि. प. मतदारसंघ यावेळी सर्वसाधारण पुरुष गटासाठी खुला झाल्याने नेत्यांना डोकेदुखी... उमेदवारांच्यात बंडाळी... तर कार्यकर्त्यांची चंगळ... आहे. सावकरांचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या कोतोली जि. प. मतदारसंघावर २०१२ ला नरके-पाटील गटाने भगवा फडकविला. यामुळे मतदारसंघात अनेक उलाथापालथी घडल्या. जनसुराज्य सध्या आपल्याकडेच ठेवण्यासाठी कार्यरत आहेत. तर शिवसेनाही वर्चस्व कायम राखण्यासाठी सतर्क आहे. यामुळे या मतदारसंघात जनसुराज्य विरुद्ध शिवसेना यांच्यातच काटा लढत होणार, हे मात्र निश्चित. भाजपही के. एस. चौगुले किंवा त्यांचे पुत्र अजय यांना मैदानात उतरवण्याच्या तयारीत आहे. मात्र, भाजप आणि जनसुराज्यची मैत्री आहे.
पक्षीय राजकारणापेक्षा पन्हाळा तालुक्याचे राजकारण हे गटा-तटाच्या राजकारणाभोवती फिरत असते. कॉँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, शेतकरी संघटना, जनसुराज्य असे गट असले तरी कार्यकर्ते मात्र, कोरे, नरके, पाटील गटानेच ओळखले जातात. या मतदारसंघात कोरे यांचे अनेक वर्षांपासून वर्चस्व होते. ते २०१२ ला नरके-पाटील यांनी आपल्या ताब्यात घेतले. यामुळे कोतोली ग्रामपंचायतही शिवसेनेने आपल्याकडे घेतली. याचा फटका कोरेंच्या आमदारकीला खरा मारक ठरला. हे ओळखूनच सध्या या मतदारसंघात दोन्ही गट सक्रिय झाले आहेत. कोतोली जि.प.साठी जनसुराज्यकडून शंकर पाटील (कोतोली), विजय तातोबा खोत, सुनील महिपती चौगुले (माळवाडी), विकास पाटील (कोलोली), विजय बाऊचकर (नणुंद्रे), जनार्दन पाटील (पाटपन्हाळा).
शिवसेना : डी. जी. पाटील, प्रकाश मारुती पाटील (कोतोली), अॅड. दीपक मुरारी पाटील (कोलोली), शरद जोतिराम मोरे (निवडे), प्रकाश दत्तात्रय पाटील (पाटपन्हाळा), सुरेश पाटील (पोहाळे).
भाजप : के. एस. चौगुले, अजय चौगुले, रणजित चौगुले, आनंदा आंगटेकर (कोतोली) आर. बी. पाटील (कोलोली).
कॉँग्रेस : सज्जन बळी पाटील (कोतोली), अॅड. शाहू काटकर (पोर्ले), दामोदर गुरव (पोहाळे).
राष्ट्रवादी : टी. डी. पाटील (सर), सरदार पाटील (कोतोली).
जनसेवा : दगडू मारुती पाटील (जनसेवा आघाडी, कोतोली), आदी उमेदवार रिंगणात आहेत.
कोतोली जि. प. मतदारसंघात जनसुराज्य गटाला मारक ठरणारे उमेदवार अॅड. शाहू काटकर हे आहेत. त्यांनी २०१२ च्या निवडणुकीत जनसुराज्य विरुद्ध सुमारे २२०० मते घेतली होती. यावेळी ते इच्छुक असून, त्यांना कॉँग्रेसने उमेदवारी दिली नाही तरी ते बंडखोरी करणार आहेत. याचा फटका जनसुराज्यच्या उमेदवाराला बसणार, हे मात्र निश्चित! तर भाजपने के. एस. चौगुले किंवा अजय चौगुले यांच्यासाठी तयारी चालविली आहे.
मतदारसंघात पुनर्रचना झाल्याने विनय कोरेंचा संपर्क कमी केला. यामुळे या गटातील कट्टर कार्यकर्ते अॅड. शाहू काटकर, दामोदर गुरव हे जनसुराज्यला नारळ देऊन कॉँग्रेसवासी झाले. त्यामुळे २०१२ ला कॉँग्रेसकडून अॅड. शाहू काटकर यांच्या पत्नी काँग्रेसकडून लढल्या त्यांनी जनसुराज्यची मते आपल्याकडे ओढली. यामुळे शिवसेनेच्या संगीता पाटील विजयी झाल्या.
गुरू-शिष्यात लढत
शंकर पाटील विरुद्ध डी. जी. पाटील अशी लढत होण्याची चिन्हे बहुतांश असून, अशी झाली तर या लढतीकडे तालुक्याचे लक्ष लागून राहणार आहे. कारण ही लढत गुरू-शिष्यात होत आहे.
जनसुराज्यकडून माजी उपसभापती शंकर पाटील यांचे नाव सध्यातरी आघाडीवर येते. जनसुराज्य गटासोबतचे मित्र पक्षाचे उमेदवार अॅड. शाहू काटकरही तितकेच आग्रही आहेत. शिवसेनेतील अनेकांना शांत करून डी. जी. पाटील किंवा प्रकाश पाटील यांना उमेदवारी देण्याच्या प्रयत्नात सध्या नेतेमंडळी आहेत.
यामुळे या मतदारसंघात जनसुराज्य विरुद्ध शिवसेना अशीच काटा लढत होणार, हे मात्र निश्चित !