कॉलेजचा शिपाईच बनला केंद्राध्यक्ष
By Admin | Updated: October 5, 2014 23:04 IST2014-10-05T22:55:08+5:302014-10-05T23:04:50+5:30
निवडणूक कार‘भार’ : निवृत्त शिक्षकांनाही आदेश

कॉलेजचा शिपाईच बनला केंद्राध्यक्ष
दत्तात्रय पाटील - म्हाकवे -विधानसभा निवडणुकीसाठी शासकीय यंत्रणेकडून जय्यत तयारी सुरू आहे. त्यादृष्टीने प्रत्येक गावातील मतदान केंद्रावर केंद्राध्यक्ष, मतदान अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या आहेत; परंतु निवडणूक विभागाने शाळा, कॉलेजातील शिपायाला केंद्राध्यक्ष, तर शिक्षक, प्राध्यापकांना मतदान प्रतिनिधी म्हणून नेमणुका दिल्या आहेत. निवृत्त शिक्षकांना नेमणुका केल्याचे दूरध्वनीद्वारे कळविले आहे. त्यामुळे याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.
प्रत्येक मतदान केंद्रावर एक केंद्राध्यक्ष, तीन मतदान प्रतिनिधी, एक शिपाई अशा यंत्रणेमार्फत नेमणुका केल्या जातात. मतदान केंद्रावर पारदर्शीपणा आणण्यासाठी केंद्राध्यक्ष दक्ष आणि अनुभवी असणे आवश्यक आहे; परंतु यंत्रणेच्या घोळामुळे काही ठिकाणी शिपायांना केंद्राध्यक्ष म्हणून, तर प्राध्यापकांना दोन नंबरचे मतदान प्रतिनिधी म्हणून नेमणुका केल्या आहेत.
त्याचबरोबर सेवानिवृत्त शिक्षकांच्याही मतदान केंद्रावर नेमणुका झाल्या आहेत. त्यांना त्यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क करून याबाबत माहिती दिली जात आहे. आपण सेवानिवृत्त झालो असल्याचे संबंधित शिक्षकांनी सांगण्याचा प्रयत्नही केला. मात्र, निवृत्त झाल्याच्या पुराव्यासह समक्ष भेटण्याच्या सूचना त्यांना दिल्या आहेत. काही सेवानिवृत्त शिक्षक परजिल्ह्यात आहेत. त्यांना विनाकारण निवडणूक यंत्रणेकडे हेलपाटे मारावे लागणार असल्याने त्यांच्यातून नाराजीचे सूर उमटत आहेत.
तलाठ्यांमार्फत केंद्राची घरपोच माहिती
मतदारांना मतदान केंद्रासह त्यांच्या मतदार यादीतील अनुक्रमांक, केंद्रक्रमांक, आदींची माहिती असलेल्या चिठ्ठ्या (स्ट्रीप) आता तलाठी, कोतवालामार्फत वाटप करण्यात येणार आहेत. त्यावर संबंधित मतदाराच्या फोटोचाही समावेश आहे. केंद्रावरील मतदान प्रतिनिधीकडे ही माहिती उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे दुबार, बोगस मतदानाला आळा बसणार आहे.