नगराध्यक्षपदाच्या आरक्षणावरच समजणार लढतीची धार
By Admin | Updated: June 10, 2016 00:13 IST2016-06-09T23:22:59+5:302016-06-10T00:13:16+5:30
मुरुगूड -नगरपालिका संभाव्य चित्र

नगराध्यक्षपदाच्या आरक्षणावरच समजणार लढतीची धार
मुरगूड -- अनिल पाटील --मुरगूड शहरामध्ये पाटील गट आणि मंडलिक गटाचे समसमान प्राबल्य असल्याने या दोन गटांतच दुरंगी लढत होणार हे नक्की आहे; पण कोणत्या गटाला विजयाची माळ घालावयाची हे मात्र ठरविण्याची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, राजेगट आणि राजेखान जमादार गट यांच्या भूमिकेमुळेच ठरणार आहे. सध्या तरी सर्वच गटांतून सावध पावले टाकण्यास सुरुवात केली असून, नगराध्यक्ष आरक्षण सोडतीवरच लढतीची धार समजणार आहे.
पालिकेच्या राजकीय इतिहासावर नजर फिरविली, तर जास्तीत जास्त वर्षे पाटील गटाची एकहाती सत्ता आहे; पण त्या-त्या वेळी त्यांना प्रबळ विरोधक म्हणून मंडलिक गटाच्या कार्यकर्त्यांनी टक्कर दिली आहे. काही वर्षे मंडलिक गटसुद्धा पाटील गटाकडून सत्ता हस्तगत करण्यात यशस्वी झाला आहे.
थेट नगराध्यक्षपदी प्रवीणसिंह पाटील २००१ ला विजयी झाले. त्या पंचवार्षिकला पाटील गटाचे नगरसेवकही जास्त निवडून आले. त्यानंतर मात्र २००६ ला मंडलिक गटाने सत्ता हिसकावून घेत सत्तेच्या स्पर्धेत ‘हम भी कुछ कम नही’ हे दाखवून दिले. २०११ च्या पंचवार्षिक निवडणुकीत मात्र आघाड्या होण्यामध्ये प्रचंड ईर्ष्या झाली. तिरंगी निवडणूक होणार आणि याचा मंडलिक गटाला फायदा होणार, अशी परिस्थिती निर्माण झाली असताना आमदार हसन मुश्रीफ यांनी त्यावेळचे मुश्रीफ गटाचे कट्टर कार्यकर्ते राजेखान जमादार यांना पाटील गटाबरोबर युती करण्यास भाग पाडले. अपेक्षेप्रमाणे १३-४ अशा फरकांनी सत्ता मिळाली. जमादार यांना पहिल्याच वर्षी उपनगराध्यक्ष पद दिले. दरम्यान, मुश्रीफ आणि जमादार यांच्यात दुरावा वाढत गेला आणि शेवटी जमादार हे मंडलिक यांच्या आश्रयाला गेले. त्यातूनच विधानसभेला मुश्रीफांवर त्यांनी जोरदार चिखलफेकही केली.
सध्या ते प्रा. संजय मंडलिक यांच्याबरोबर आहेत. सभागृहामध्ये त्यामुळेच १० पाटील गट व ७ मंडलिक गट असे बलाबल मानण्यात येते. तालुक्यासह जिल्ह्याच्या राजकारणातही रणजितसिंह पाटील, प्रवीणसिंह पाटील हे हसन मुश्रीफ यांच्यासोबतच आहेत. त्यामुळे येणाऱ्या पंचवार्र्षिक निवडणुकीत मुश्रीफ हे पाटील गटाच्या पाठीमागेच उभे असणार हे जगजाहीर आहे.
मंडलिक गटाने पालिकेतील सत्ता हस्तगत करावयाची जोरदार तयारी केली आहे. मंडलिक गटाची धुरा आपल्याच हातात घेऊन मार्गस्थ असणारे राजेखान जमादार यांनी नगराध्यक्ष पदासाठी आपली उमेदवारी असणारंच, असा निर्धारच केल्याने लढतीमध्ये चुरस निर्माण होणार हे मात्र नक्की. मागील निवडणुकीत तटस्थ राहिलेला राजे गट यावेळी कोणती भूमिका घेतो, हे महत्त्वाचे आहे. या गटातील प्रमुख मंडळी मात्र पाटील गटाबरोबरच राहण्याच्या मानसिकतेत आहेत; पण गटाचे प्रमुख समरजितसिंह घाटगे यांच्या निर्णयावर आघाडी धर्म कळणार आहे. सध्या मात्र पाटील, मुश्रीफ, राजे हे तिन्ही गट एकत्रित राहतील व मंडलिक गट आणि जमादार गट एकत्रित राहून दुहेरी लढतील आणि नागरिकांचा कल आजमावतील, असे चित्र दिसत आहे.