एकरकमी एफआरपीसाठी पुढील आठवड्यात मोदींना भेटणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:25 IST2021-09-18T04:25:46+5:302021-09-18T04:25:46+5:30
कोल्हापूर: एफआरपीमध्ये तुकडे करण्यात केंद्र सरकारचा कोणताही हात नाही, ते हस्तक्षेप देखील करणार नाहीत, पण एकूणच शेतकऱ्यांच्या मनात असलेल्या ...

एकरकमी एफआरपीसाठी पुढील आठवड्यात मोदींना भेटणार
कोल्हापूर: एफआरपीमध्ये तुकडे करण्यात केंद्र सरकारचा कोणताही हात नाही, ते हस्तक्षेप देखील करणार नाहीत, पण एकूणच शेतकऱ्यांच्या मनात असलेल्या अस्वस्थेबद्दल चर्चा करण्यासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पुढील आठवड्यात आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहोत, अशी माहिती आमदार सदाभाऊ खोत यांनी दिली.
सैन्य भरतीच्या मागणीसाठी काढण्यात आलेल्या तरुणांच्या मोर्चादरम्यान खोत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना एफआरपीबद्दलची भूमिका स्पष्ट केली. एफआरपीचे तुकडे कदापिही सहन केले जाणार नाही. एकरकमीच एफआरपी देण्याबाबत केंद्र सरकारदेखील सकारात्मक आहे. त्यांनी कोणतीही शिफारस केलेली नाही. याउलट राज्य सरकारच टप्पे पाडून एफआरपी देण्याच्या मानसिकतेत असल्याचा आरोपही खोत यांनी केला.
खोत म्हणाले की, महापुरातील नुकसानग्रस्तांनाही महाविकास आघाडीने वाऱ्यावर सोडले. कर्जमाफीची मागणी केलेली असतानाही सरकार दुर्लक्ष करत असल्याबद्दलही नाराजी व्यक्त केली.
सरकारबरोबरचे घटक पक्ष मगरीचे आसू दाखवत आहेत, ही नौटंकी बंद करावी, अशी टीका राजू शेट्टी यांचे नाव न घेता खोत यांनी केली. शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही म्हणून बाहेर पडलो, असे म्हणणारे आता काय चणे फुटाणे खाण्यासाठी तेथे थांबले आहेत, अशी विचारणा करत सरकारमधून बाहेर पडून दाखवा, असे आव्हानच खोत यांनी दिले.