देव घडविण्याच्या कामाचा श्रीगणेशा
By Admin | Updated: July 7, 2015 23:52 IST2015-07-07T23:52:00+5:302015-07-07T23:52:00+5:30
गणेशोत्सवाची तयारी : कुंभारवाड्यात लहानमोठ्या गणेशमूर्ती साकारू लागल्या

देव घडविण्याच्या कामाचा श्रीगणेशा
कोल्हापूर : गणेशोत्सवाला अडीच महिन्यांचा कालावधी असल्याने आता कुंभारवाड्यात लाडक्या गणरायाच्या आकर्षक मूर्ती साकारू लागल्या आहेत. पावसाची उघडीप आणि अधिक महिन्यामुळे उत्सवाची पुढे गेलेली तारीख यामुळे कुंभार बांधवांनी आता देव घडविण्याच्या कामाचा श्रीगणेशा केला आहे. दर तीन वर्षांनी येणाऱ्या अधिक महिन्यामुळे यंदा सगळे सण एक महिन्याने पुढे गेले आहेत. त्यामुळे दरवर्षी आॅगस्टमध्ये येणारा गणेशोत्सव यंदा १७ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. त्यामुळे अजून अडीच महिन्यांचा कालावधी शिल्लक असल्याने कुंभार बांधवांनाही मूर्ती बनविण्यासाठी बऱ्यापैकी कालावधी मिळाला आहे. त्यामुळे अजूनही मूर्ती बनविण्याच्या कामाला म्हणावा तसा वेग आलेला नाही. मात्र, देव घडविण्याच्या कामाचा प्रारंभ झाला आहे. कोल्हापुरातील शाहूपुरीतील कुंभार गल्ली आणि गंगावेश, पापाची तिकटी परिसरातील कुंभार बांधवांच्या घरांसमोर आता पत्र्याचे शेड उभारले आहेत.
घरगुती गणेशमूर्ती बनवायला फार वेळ लागत नाही; त्यामुळे सध्या मंडळांच्या मोठ्या म्हणजे पाच ते दहा फुटांपर्यंतच्या गणेशमूर्ती साकारल्या जात आहेत. प्लास्टर आॅफ पॅरिस, नारळाच्या शेंड्या यांचा लगदा करून साचा करून काही मूर्ती बनविण्यात आल्या आहेत. ज्या कुटुंबांत गणेशमूर्तींच्या ठरलेल्या आॅर्डर आहेत, त्या कुंभार बांधवांनी मात्र लहान मूर्तीही साकारायला सुरुवात केली आहे.
पाऊस असला की, मूर्ती वाळायला वेळ लागतो; पण आता पावसाने उघडीप दिल्याने मूर्ती घडविण्यातही फारशा अडचणी येत नाहीत. मोठ्या गणेशमूर्ती मार्केट यार्ड व बापट कॅम्प परिसरात घडविल्या जात आहेत.
त्र्यंबोली यात्रेनंतरच येणार वेग
आषाढात मंगळवारी व शुक्रवारी नदीला आलेले नवे पाणी त्र्यंबोली देवीला यात्रा करून वाहण्याची पद्धत आहे. महिनाभर चालणाऱ्या या यात्रेनंतरच गणेशोत्सवाच्या तयारीला खरा वेग येणार आहे. आता काही मंडळे ठरलेल्या कुंभारांकडे मूर्ती बनविण्याची आॅर्डर देत आहेत. गेल्या काही वर्षांत देखावे करण्याऐवजी आकर्षक गणेशमूर्तीची स्थापना केली जात असली तरी बहुतांश मंडळांनी एकच गणेशमूर्ती कायमस्वरूपी ठरवून दागिने बनवून घेण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे मूर्तीचे सौंदर्य तर वाढतेच; पण मंडळांकडेही संपत्ती जमा होते.