‘त्या’ अपघातग्रस्त तरुणाच्या मदतीसाठी कोकणातील वालावलकर हॉस्पिटल धावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:22 AM2021-04-14T04:22:20+5:302021-04-14T04:22:20+5:30

‘लोकमत’ने मांडली होती मंगेशची कहाणी नेसरी.... वर्षभरापूर्वी हरळी (ता. गडहिंग्लज)जवळ झालेल्या मोटारसायकल अपघातात पाठीचा मणका मोडलेल्या मंगेश गुरव ...

He rushed to Walawalkar Hospital in Konkan to help the injured youth | ‘त्या’ अपघातग्रस्त तरुणाच्या मदतीसाठी कोकणातील वालावलकर हॉस्पिटल धावले

‘त्या’ अपघातग्रस्त तरुणाच्या मदतीसाठी कोकणातील वालावलकर हॉस्पिटल धावले

Next

‘लोकमत’ने मांडली होती मंगेशची कहाणी

नेसरी....

वर्षभरापूर्वी हरळी (ता. गडहिंग्लज)जवळ झालेल्या मोटारसायकल अपघातात पाठीचा मणका मोडलेल्या मंगेश गुरव या तरुणाच्या मदतीसाठी कोकणातील डेरवण - सावर्डे येथील वालावलकर हॉस्पिटल धावून आले आहे. मुंबई येथील एका खासगी रुग्णालयामध्ये या शस्त्रक्रियेसाठी सुमारे आठ लाख रुपये खर्च येणार होता. ती शस्त्रक्रिया आता वालावलकर हॉस्पिटलमध्ये कमी खर्चात होणार आहे. त्यांच्या या मदतीमुळे पीडित मंगेशच्या सामान्य जीवन जगण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

‘लोकमत’ने २७ मार्च रोजी "बिद्रेवाडीच्या गुरवला हवी मदत" या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध करून, वर्षभर अंथरुणावर पडून असलेल्या गरीब मंगेशच्या अपघातामुळे झालेल्या परिस्थितीची व्यथा मांडली होती. त्यानुसार कोकणातील प्रसिद्ध व सेवाभाव जपलेल्या वालावलकर हॉस्पिटलच्या ट्रस्टींनी या बातमीची नोंद घेऊन या गरीब तरुणाची शस्त्रक्रिया करण्याची तयारी दर्शवली. त्यानुसार रुग्णालयाने त्याचे मागील सर्व रिपोर्ट पाहून डॉक्टरांनी होकार कळवला. कोगनोळी येथील सेवाभावी कार्यकर्ते सुनील आबदागिरी व नेसरी येथील गुलाबराव पाटील व रवींद्र हिडदुगी यांच्या प्रयत्नातून डेरवण येथे नुकताच तो दाखल झाला आहे. तेथे त्याच्या सर्व प्राथमिक चाचण्या घेतल्या जात असून लवकरच त्याच्यावर शस्त्रक्रिया होणार आहे. राज्यातील नामवंत व प्रसिद्ध ऑर्थोपेडिक तज्ज्ञ डॉ. नाडकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली ही शस्त्रक्रिया होणार आहे.

आता शस्त्रक्रियेसाठीचा प्रश्न मिटला असला तरी औषधे व उर्वरित खर्चासाठी त्याला आर्थिक मदतीची गरज आहे. त्यासाठी दानशूर व्यक्ती व सेवाभावी संस्थांनी मदतीचा हात द्यावा, असे आवाहन सामाजिक कार्य समितीने केले आहे.

फोटो ओळी

‘लोकमत’ने केलेल्या आवाहनानुसार एस. एस. हायस्कूल नेसरीच्या १९९० च्या वर्गमित्रांनी मंगेश गुरव याला ११००० रुपयांची मदत दिली. ही मदत अनिल देसाई यांच्याहस्ते स्वीकारली. यावेळी बापूसोा घवाळे, दिलीप पाटील, उमेश दळवी, बाळू वांजोळे, गुलाबराव पाटील, अमोल बगडी, सुरेश गवळी, सतीश खराबे, अभिजित कुंभार, मुरलीधर कुंभार आदी उपस्थित होते.

Web Title: He rushed to Walawalkar Hospital in Konkan to help the injured youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.