पाठीमागून आले अन् गोळीबार केला
By Admin | Updated: March 16, 2015 00:45 IST2015-03-16T00:45:17+5:302015-03-16T00:45:30+5:30
उमा पानसरे : हल्लेखोरांबाबत पोलिसांनी घटनास्थळावरून घेतली माहिती

पाठीमागून आले अन् गोळीबार केला
कोल्हापूर : ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या घटनास्थळाची पाहणी या प्रकरणातील एकमेव साक्षीदार उमा पानसरे व तपास अधिकारी अंकित गोयल यांनी रविवारी सकाळी केली. यावेळी गोयल यांनी ‘आई, तुम्हाला काही आठवतंय का?’ अशी विचारणा केली. त्यावर त्यांनी हल्लेखोर पाठीमागून आले आणि साहेबांवर गोळीबार केला. त्यानंतर आपण बेशुद्ध पडल्याने पुढचे काही आठवत नसल्याचे सांगितले. गोयल यांनी सुमारे अर्धा तास त्यांच्याकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला. १६ फेब्रुवारी रोजी पानसरे दाम्पत्यावर गोळीबार झाला. त्यामध्ये गंभीर जखमी झालेले अॅड. गोविंद पानसरे यांचा मृत्यू झाला. या प्रकरणातील प्रत्यक्ष साक्षीदार त्यांच्या पत्नी उमा या रुग्णालयातून उपचार घेऊन घरी परतल्या आहेत. त्यांच्या जबाबावर तपासाची दिशा ठरणार असल्याने तो घेण्यासाठी पोलीस कसोशीने प्रयत्न करीत होते. दरम्यान, शनिवारी त्या थेट वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधींशी बोलल्याने पोलीस प्रशासनाची धांदल उडाली. अप्पर पोलीस अधीक्षक गोयल यांनी शनिवारी रात्री आठच्या सुमारास त्यांची घरी भेट घेतली. मारेकऱ्यांची रेखाचित्रे दाखविली असता त्यांनी त्यावर कोणतेच उत्तर दिले नाही. ापण हास्यक्लबमधून जाऊन आल्यानंतर हल्ला झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. सुमारे दीड तास ते त्यांच्याकडून माहिती घेत होते. त्यानंतर रविवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास पुन्हा गोयल यांनी त्यांची भेट घेतली. त्यांच्या घरापासून काही अंतरावरच हल्ला झाला, ते घटनास्थळ उमा पानसरे यांना दाखविण्यात आले. यावेळी त्यांना व्हीलचेअरवरून घटनास्थळी आणण्यात आले. त्यांच्यासोबत त्यांचे जावई बन्सी सातपुते, मुलगी स्मिता, सून मेघा, नातू कबीर व मल्हार, दिलीप पवार व मिलिंद यादव होते. यावेळी गोयल यांनी त्यांच्याकडून हल्ल्याची माहिती घेतली.
मोटारसायकलीबाबत विसंगत माहिती
पोलिसांनी स्प्लेंडर व पल्सर अशा दोन मोटारसायकली जप्त केल्या आहेत. उमा पानसरे यांनी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये दोघे मारेकरी बुलेटवरून आल्याचे सांगितल्याने पोलीस चक्रावले आहेत. रविवारी सकाळी जप्त केलेल्या स्प्लेंडर व पल्सर या दोन मोटारसायकली उमा पानसरे यांना दाखविल्या. यावेळी त्यांनी मोटारसायकल नेमकी कोणती होती, हे आठवत नसल्याचे सांगितले.
उमा पानसरे यांची भेट घेऊन त्यांना घटनास्थळ दाखविले असता त्यांनी हल्ला कसा झाला, याची थोडीफार माहिती दिली. अद्याप पूर्ण माहिती मिळालेली नाही. आठवेल तशी त्या आम्हाला माहिती देत आहेत. टप्प्याटप्प्याने त्यांच्याकडून याप्रकरणी संपूर्ण माहिती घेतली जाईल.
- अंकित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक
कोल्हापुरात ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या साक्षीदार त्यांच्या पत्नी उमा पानसरे यांच्यासह पोलीस अधिकाऱ्यांनी रविवारी घटनास्थळाची पाहणी केली.