‘तो’ बॉँबस्फोट पूर्ववैमनस्यातून
By Admin | Updated: September 2, 2014 00:30 IST2014-09-02T00:25:42+5:302014-09-02T00:30:11+5:30
एकजण ताब्यात : पैशाच्या वादातून मित्राचा काढायचा होता काटा; पुस्तक वाचून बनविला बॉँब

‘तो’ बॉँबस्फोट पूर्ववैमनस्यातून
कोल्हापूर : शाहू जकात नाक्याजवळ आठ दिवसांपूर्वी झालेला गावठी बॉम्बस्फोट वैयक्तिक दुश्मनीतून झाल्याचे उघडकीस आले आहे. पैशाचा वादातून मित्राच काटा काढण्यासाठी हा बॉँबस्फोट घडविला गेल्याचा पोलीसांचा संशय आहे. दहशतवादविरोधी पथक आणि कोल्हापूर पोलिसांनी याप्रकरणी एकास ताब्यात घेतले आहे.
अविनाश बाबुराव बन (रा. कोल्हापूर) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव असल्याचे समजते. विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीधर कोठावळे यांचे शाहू चौकात गॅरेज आहे. बन हा त्यांच्या शेजारीच राहत होता. दोघेही मित्र होते. कोठावळे यांनी बन याला दोन लाख रुपये उसने दिले होते. ते परत देत नसल्याने दोघांची सतत भांडणे होत होती. या भांडणातून बन याने कोठावळे यांचा काटा काढण्याचे ठरविले. त्यासाठी बन याने बॉँबस्फोट करण्याचे ठरविले. त्याने बॉँब कसा तयार करायचा, याचे पुस्तकही आणले. विशेष म्हणजे कोठावळेंच्या गॅरेजमधील बेअरिंग, डिटोनेटर, छर्रे वापरून बन याने बॉँब तयार केला.
आठ दिवसांपूर्वी शाहू चौकातील समर्थ आॅटो गॅरेज येथे त्याने बॉँबचा स्फोट घडविला. कोल्हापुरात ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर बॉम्बस्फोट झाल्याने पोलीसांची झोपच उडाली होती. गृहखात्यानेही या प्रकरणाची माहिती मागविली होती. राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली होती.
बॉँबस्फोटात कोठावळे आणि त्यांचा मित्र मनोज परब हे जखमी झाले होते. नेमका बॉँबस्फोट झाला त्यावेळीच दोघे येथे कसे? यामुळे सुरूवातीला पोलिसांचा त्यांच्यावरही संशय होता. त्यामुळे या दोघांची पोलीस कसून चौकशी करत होते. कोठावळे यांच्याकडे केलेल्या चौकशीत काही दिवसांपूर्वीच बन याचे त्यांच्याशी वाद झाल्याचे पोलीसांना समजले. त्यावरून पोलिसांनी तपास सुरू केला असता बन याच्या घरात पोलिसांना बॉँब कसा तयार करायचा, याचे पुस्तक सापडले. त्यावरून तपास केला असता बन यानेच स्फोटाचा कट आखल्याचे उघडकीस आले. त्यासाठी त्याने बॉँब तयार करण्याची सर्व माहिती घेतली आणि आईस्क्रिमच्या डब्यामध्ये सर्व साहित्य ठेवून त्याचा बॉँब तयार केला. (प्रतिनिधी)