सेवेच्या भावनेतूनच त्यांनी घेतले अंध अमोलला दत्तक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 05:43 IST2021-01-03T05:43:43+5:302021-01-03T05:43:50+5:30
मानकर कुटुंबीयांचे मोठेपण : खासगी ड्रायव्हरच्या मनाची श्रीमंती

सेवेच्या भावनेतूनच त्यांनी घेतले अंध अमोलला दत्तक
- विश्र्वास पाटील
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : चांगले काम करण्यासाठी तुमच्या खिशात पैसेच असायला हवेत असे काही नाही. मुंबईतील एका खासगी गाडीवर ड्रायव्हर
म्हणून काम करणाऱ्या व कसेबसे दरमहा १५ हजार रुपये पगार मिळणाऱ्या अशोक शंकर मानकर यांनी फक्त सेवेच्या भावनेतून आजन्म अंध असलेल्या अमोलला दत्तक घेतले आहे. अमोलचे आईवडील बनून मानकर दाम्पत्याने मनाची श्रीमंती दाखवून दिली आहे. मानकर यांच्या शिक्षिका असलेल्या दोन्ही मुली ब्रह्माकुमारी परिवारामध्ये वसईला सेवेत लीन झाल्या आहेत. त्यांचा मुलगा अभिषेक हा जिम प्रशिक्षक आहे.
अमोल मूळचा कोकणातील. आईला एक डोळा नाही व मुलगाही पूर्ण अंधच जन्माला आल्यावर कुटुंबाने त्यांना घराबाहेर काढले. त्यामुळे तो
डॉ. प्रमिला जरग यांच्या मुंबईतील शिशुआधार केंद्रात आला. जरग यांनी मुंबईतील सर्व रुग्णालयांत त्याच्या डोळ्यांवर उपचार केले. डॉ. तात्याराव लहाने यांनीही त्याची तपासणी केली; परंतु मेंदूकडून डोळ्याकडे जाणाऱ्या रक्तवाहिन्याच नसल्याने व बुबुळ नसल्याने त्याचे अंधत्व दूर करता आले नाही.
विशेष मुलांचा अभ्यास करण्यासाठी म्हणून मानकर यांच्या दोन्ही मुली जरग यांच्या संस्थेत येत होत्या. त्यांना अमोलचा लळा लागला व त्यांनी त्यास दत्तक घेण्याचा निर्णय घेतला. त्याचे अंधत्व आयुष्यभर राहणार आहे असे सांगूनही त्यांचा निर्धार तसूभरही कमी
झाला नाही. अमोलचा एक पाय उलटा होता, त्याला चालता येत नव्हते, वाडिया हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली. जे डॉक्टर अशा मुलाला कशाला दत्तक घेतले म्हणत होते, त्यांनी शस्त्रक्रियेचा एक रुपयाही घेतला नाही. अमोल आता आठ वर्षांचा आहे. तो दुसरीत शिकतो. तो प्रचंड हुशार आहे. दिसायलाही अतिशय सुंदर आहे. कुणीही पाहिले तर त्याला उचलून घ्यायचा मोह आवरत नाही.
सेवावृत्तीला सलामच
n मानकर मूळचे नाशिक जिल्ह्यातील; परंतु गेली अनेक वर्षे ते मुंबईत परळला राहतात. त्यांनी अंध अमोलला दत्तक घेतल्याचे समजल्यावर तेथील एका बांधकाम व्यावसायिकाने मानकर यांच्या सेवावृत्तीला सलाम म्हणून तब्बल ७५ लाखांचा फ्लॅट
त्यांना भेट दिला आहे. तो भाड्याने देऊन मानकर सध्या विरारला राहतात.