हाळवणकरांची आवाडेंवर राजकीय कुरघोडी

By Admin | Updated: October 16, 2015 00:48 IST2015-10-15T23:30:12+5:302015-10-16T00:48:50+5:30

काँग्रेसला खिंडार : शहर विकास आघाडीकडे शिक्षण मंडळाची सत्ता, ५० वर्षांत ३२ सभापती; पण प्रथमच सत्तांतर

Havvankar's movement on the state turf | हाळवणकरांची आवाडेंवर राजकीय कुरघोडी

हाळवणकरांची आवाडेंवर राजकीय कुरघोडी

राजाराम पाटील-इचलकरंजी--साधारणत: ५० वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या नगरपालिका शिक्षण मंडळात गुरुवारी सत्ताबदल झाला. शिक्षण मंडळावर असलेली कॉँग्रेसची सत्ता काढून घेत प्रथमच शहर विकास आघाडीने कॉँग्रेसला खिंडार पाडले. हा बदल घडवून आमदार सुरेश हाळवणकर यांनी माजी मंत्री प्रकाश आवाडे यांच्यावर राजकीय कुरघोडी केली. ‘कॉँग्रेसला खिंडार’ पडले असल्याचे वृत्त सर्वांत प्रथम ‘लोकमत’ ने प्रसिद्ध करून सत्ता बदलाचे भाकीत केले होते.इचलकरंजीच्या नगरपालिका शिक्षण मंडळाला एक वेगळी परंपरा आहे. पाच दशकाच्या शिक्षण मंडळाचे पहिले सभापती डी. के. कुलकर्णी होते. या मंडळावर सभापती असलेल्या सरोजिनी खंजिरे पुढे शिरोळच्या विधानसभा सदस्य झाल्या. तर जयवंतराव आवळे वडगाव मतदारसंघाचे आमदार आणि लातूरचे खासदारही झाले. अशा प्रकारे कॉँग्रेसच्या दिग्गजांनी शिक्षण मंडळाचे सभापतिपद भूषविल्याने त्याला राजकीय वलय आहे.
शिक्षण मंडळाकडे पूर्वी ५७ प्राथमिक शाळांमधून सुमारे २५ हजार विद्यार्थी-विद्यार्थिनी शिकत होते. अलीकडे खासगी शाळांचे पेव फुटल्याने शिक्षण मंडळाकडील शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या रोडावली आहे. तरीही अशा शाळांमध्ये सुमारे चौदा हजार विद्यार्थी ज्ञानार्जन करीत आहेत. नगरपालिका शिक्षण मंडळाकडे ३२ सभापती झाले, ते सर्व कॉँग्रेसचे होते.
सन २०१२ मध्ये झालेल्या निवडीमध्ये शिक्षण मंडळाचे कॉँग्रेसचे सहा, राष्ट्रवादीचा एक, शहर विकास आघाडीचे तीन असे सदस्य होते. कॉँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी त्यांच्याकडील सर्व सदस्यांना सभापतिपदाची संधी देण्याचा निर्णय घेतला होता. त्याप्रमाणे सुरुवातीला दत्तात्रय कित्तुरे व त्यानंतर तौफिक मुजावर सभापती झाले. तर नगरपालिकेत असलेली दोन्ही कॉँग्रेसची आघाडी शिक्षण मंडळातही होती. शिक्षण मंडळाचे एकमेव सदस्य नितीन कोकणे यांच्याकडे उपसभापतिपद आहे. पक्षांतर्गत ठरल्याप्रमाणे तौफिक मुजावर यांनी सभापतिपदाचा फेब्रुवारीमध्ये राजीनामा दिला. त्यानंतर उपसभापती असलेले कोकणे यांनी निवडणूक कार्यक्रम लावणे आवश्यक होते. मात्र, नगरपालिकेत झालेल्या राजकीय बदलाच्या पार्श्वभूमीवर कोकणे यांनी निवडणूक कार्यक्रम लावला नाही. त्यामुळे प्रभारी सभापतिपद गेले सात महिने त्यांच्याकडेच राहिले.
कॉँग्रेसने प्रयत्न करून जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांना निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यास भाग पाडले. त्याप्रमाणे १३ आॅगस्टला सभापतिपदाची निवडणूक होणार होती; पण ‘शविआ’ चे राजू हणबर यांनी शिक्षण मंडळाकडे
शासन नियुक्त सदस्यांची नियुक्ती झाली नसल्याने मंडळाकडील सदस्य संख्या अपुरी असल्याची तक्रार शिक्षण मंत्री विनोद तावडे
यांच्याकडे केली. त्यावेळी आमदार हाळवणकर यांनी तावडे यांच्याकडे आग्रह धरून त्यावेळच्या निवडणुकीला स्थगिती मिळविली. दरम्यानच्या काळात आमदार हाळवणकर
यांनी भाजपचे सदस्य म्हणून विलास रानडे व जया हुरकट यांची निवड शासन नियुक्त सदस्यपदी केली आणि त्यांची नावे राजपत्रित करण्यात आली.
त्यानंतर जिल्हा शिक्षण अधिकारी सुभाष चौगुले यांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. गुरूवारी झालेल्या सभापती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कॉँग्रेसचे रमेश कांबळे फुटले. तर शिक्षण मंडळाच्या इतिहासात प्रथमच गटशिक्षण अधिकारी भास्करराव बाबर यांनी ‘शविआ’च्या सदस्याला मतदान केले. अशा प्रकारे ‘शविआ’ चे राजू हणबर यांना आठ, तर
विरोधी कॉँग्रेसचे अमरजित जाधव यांना पाच मते पडली. आणि इतिहासात प्रथमच गैर कॉँग्रेसी सदस्य शिक्षण मंडळावर सभापती म्हणून विराजमान झाला.


कॉँग्रेसच्या पराभवाची मालिका
पालिका प्रभाग क्रमांक पाचमधील पोटनिवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचे विठ्ठल चोपडे यांनी कॉँग्रेसचे विलास गाताडे यांचा पराभव केला. त्यानंतर झालेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत कॉँग्रेसला हार पत्करावी लागली. तर कॉँग्रेसच्या नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे यांनी राजीनामा देण्यास नकार देत बंड केले. त्यांच्या बंडाला ‘शविआ’ व कारंडे गटाने पाठिंबा दिला आणि आता शिक्षण मंडळातसुद्धा कॉँग्रेसची सत्ता बदलून टाकण्यात ‘शविआ’ ला यश आले.


... तर सत्ताबदल टळला असता
सध्याच्या शिक्षण मंडळातील सदस्य अस्तित्वात आल्यानंतर शासन नियुक्त सदस्य म्हणून मेहबूब मुजावर (राष्ट्रवादी) व चंद्रशेखर शहा (कॉँग्रेस) यांची नियुक्ती झाली होती. मात्र, या दोघांची नावे राजपत्रामध्ये प्रसिद्ध झाली नाहीत. परिणामी, दोन्ही कॉँग्रेसच्या दोघांनाही शिक्षण मंडळापासून वंचित राहावे लागले. हे दोघे राजपत्रित झाले असते तर गुरूवारी शिक्षण मंडळात झालेला सत्ताबदल झाला नसता, अशी प्रतिक्रिया जाणकारांतून व्यक्त होत आहे.

Web Title: Havvankar's movement on the state turf

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.