नृसिंहवाडीत अतिक्रमणावर हातोडा

By Admin | Updated: March 13, 2015 23:58 IST2015-03-13T23:46:58+5:302015-03-13T23:58:13+5:30

राशिचक्रकार शरद उपाध्ये यांचे अतिक्रमण जमीनदोस्त केल्याने नृसिंहवाडी गावातील इतर अतिक्रमणधारकांचे धाबे दणाणले आहेत.

Hathoda on the encroachers at Nrusinhawad | नृसिंहवाडीत अतिक्रमणावर हातोडा

नृसिंहवाडीत अतिक्रमणावर हातोडा

नृसिंहवाडी : गेली अनेक वर्षे वादाच्या चक्रात अडकलेले राशिचक्रकार शरद उपाध्ये यांच्या लक्ष्मी नृसिंह ट्रस्ट (मुंबई) संचलित वेदभवन या त्यांच्या वास्तूशेजारी झालेल्या अतिक्रमणावर शुक्रवारी ग्रामपंचायतीने हातोडा टाकला.
नोटीस पाठवूनही अतिक्रमण न हटविल्यामुळे ग्रामपंचायतीच्या पथकाने जेसीबीच्या सहायाने हे अतिक्रमण जमीनदोस्त केले. तसेच अतिक्रमणित शेडमधील साहित्य जप्त केले.शुक्रवारी सकाळी ९ वाजता ग्रामविकास अधिकारी नंदकुमार निर्मळे व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी अतिक्रमण शेड काढण्याचा निर्धार केला. त्यानुसार ग्रामस्थांच्या उपस्थितीत कारवाईला प्रारंभ झाला. सुरुवातीला पंचांनी पंचनामा केला. उच्च न्यायालयाच्या निकालानुसार अतिक्रमण सिद्ध झाल्याने राजश्री कांबळे व ग्रामविकास अधिकारी नंदकुमार निर्मळे यांनी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना लेखी आदेश देऊन अतिक्रमणविरोधी पथक नियुक्त केले.
अतिक्रमणप्रश्नी शरद उपाध्ये यांच्या ट्रस्टने ग्रामपंचायतीचे आजी-माजी पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यावर बदनामीचे गुन्हे दाखल करून न्यायालयात आव्हान दिले होते. त्यामुळे हा प्रश्न प्रतिष्ठेचा बनला होता. शेवटी न्यायालयीन निकाल व जिल्हा परिषदेचा आदेश यांची अंमलबजावणी करून शरद उपाध्ये यांनी बांधलेल्या वेदभवनजवळील मिळकत नं. ९६१ जवळ असलेल्या सार्वजनिक खुल्या जागेवर बांधण्यात आलेली पत्राशेड इमारत जमीनदोस्त केली.
ग्रामपंचायतीने मुंबई ग्रामपंचायत अधिनियम कलम ५३/२ नुसार ही कारवाई केल्याचे सरपंच राजश्री कांबळे व उपसरपंच अभिजित जगदाळे, सदस्य अनंत धनवडे यांनी सांगितले. या कारवाईवेळी सदस्य सर्वश्री अशोक पुजारी, परशुराव गवंडी, राजेंद्र आणुजे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)

राशिचक्रकार शरद उपाध्ये यांचे अतिक्रमण जमीनदोस्त केल्याने नृसिंहवाडी गावातील इतर अतिक्रमणधारकांचे धाबे दणाणले आहेत.

Web Title: Hathoda on the encroachers at Nrusinhawad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.