हातकणंगलेतील २१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे पडघम
By Admin | Updated: December 19, 2014 00:20 IST2014-12-18T22:09:52+5:302014-12-19T00:20:26+5:30
२१ ग्रामपंचायतींच्या वॉर्ड (प्रभाग) रचना कार्यक्रमाला गती आली आहे

हातकणंगलेतील २१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे पडघम
दत्ता बीडकर - हातकणंगले -तालुक्यातील २१ ग्रामपंचायतींच्या मुदती जुलै २०१५ मध्ये संपत आहेत. या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली. राखीव वॉर्डातून निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्राची सक्ती करण्यात आल्यामुळे तहसील कार्यालयामध्ये जात प्रमाणपत्राचे प्रस्ताव दाखल करण्यासाठी झुंबड उडाली आहे.
२१ ग्रामपंचायतींच्या वॉर्ड (प्रभाग) रचना कार्यक्रमाला गती आली आहे. तसेच तालुक्यातील ६२ गावांच्या ग्रामपंचायतींच्या सरपंच आरक्षण सोडतीबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाकडून १५ दिवसांत अधिसूचना प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे.
तालुक्यातील कबनूर, चंदूर, जंगमवाडी, माणगाववाडी, माणगाव, तिळवणी, रूई, किणी, नेज, कुंभोज, दुर्गेवाडी, बिरदेववाडी, मिणचे, लाटवडे, खोची, वाठार तर्फ उदगांव, तासगांव, वाठार तर्फ वडगांव, पाडळी, आणि मनपाडळे या २१ ग्रामपंचायतींची पंचवार्षिक मुदत जुलै, आॅगस्ट २०१५ मध्ये संपत आहे. निवडणुकीच्या अगोदर सहा महिने प्रभाग रचना सुरू केली जाते. त्याप्रमाणे प्रभाग रचनेच्या कामाला गती आली आहे. प्रभाग रचनेवरील हरकती सुनावणीसाठी पुरेसा वेळ मिळावा याकरिता प्रभाग रचनेच्या कामामध्ये प्रशासन व्यस्त आहे.
निवडणूक आयोगाने राखीव प्रभागांतून उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्यांना जात वैधता प्रमाणपत्राची सक्ती केली आहे. यासाठी तहसील कार्यालयातील निवडणूक शाखेमध्ये जातप्रमाणपत्राचे प्रस्ताव दाखल करण्यासाठी स्वतंत्र कक्षाची उभारणी करण्यात आली आहे. २१ ग्रामपंचायतींसाठी राखीव जागेवरून निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी २१ डिसेंबर ते ९ जानेवारी या कालावधीत आपले वैधता प्रमाणपत्रासाठीचे प्रस्ताव तालुका कार्यालयाकडे सादर करण्याची मुदत आहे.
तालुक्यातील २१ ग्रामपंचायतींसाठी राजकीय समीकरणे बदलत चालली आहेत. पक्षापेक्षा ग्रामपातळीवरील आघाड्यांना महत्त्व दिले जात आहे. कॉँग्रेस-राष्ट्रवादी बॅकफुटवर गेल्यामुळे शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे.
तालुक्यातील ६२ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण सोडतीची अधिसूचना जिल्हाधिकारी कार्यालयाकडून अद्याप प्रसिद्ध झालेली नाही. २१ ग्रामपंचायतींच्या निवडणुका नवीन सरपंच आरक्षणाप्रमाणे पार पडणार आहेत. मात्र आॅक्टोबर-नोव्हेंबर २०१७ मध्ये मुदत संपणाऱ्या ४१ ग्रामपंचायतींची सरपंच आरक्षण सोडत ही याच पंधरा दिवसांत जाहीर होणार असल्याने पुढील अडीच वर्षांनी होणाऱ्या निवडणुकाचे सरपंचही याचवेळी निश्चित होणार आहेत.
तालुक्यात सध्या सहकारी संस्थांच्या निवडणुकीची धामधूम सुरू आहे. यानंतर बाजार समिती, के.डी.सी.सी. आणि गोकुळबरोबर पंचगंगा साखर कारखाना निवडणुका मे २०१५ अखेर होणार असल्याने सहा महिने तालुक्यात निवडणुकीचे वारे आहे. यामुळे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे वारे आपोआप तयार होत आहे.