हातकणंगलेत लक्षवेधी तिरंगी लढत
By Admin | Updated: February 15, 2017 23:48 IST2017-02-15T23:48:53+5:302017-02-15T23:48:53+5:30
तदारसंघातील राजकारण आणि राजकीय समीकरणे बदलून गेली आहेत.

हातकणंगलेत लक्षवेधी तिरंगी लढत
दत्ता बिडकर --हातकणंगले तालुक्याच्या नावाने ओळखला जाणारा आणि तालुक्याचे नाक असलेल्या या मतदारसंघात काँग्रेस, भाजप आणि शिवसेना अशी तिरंगी लढत असली तरी राजकारणात कसलेले भाजपचे अरुण इंगवले विरुद्ध नवखे काँग्रेस पक्षाचे संदीप कारडे अशी काटा जोड लक्षवेधी लढत या मतदारसंघात होत आहे. हातकणंगले जिल्हा परिषद मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. २00२ च्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या स्मिता अरुण इंगवले विजयी झाल्या होत्या. २00७ हा मतदारसंघ राखीव झाल्याने या निवडणुकीत इंगवले कुटुंबातील कोणीही उमेदवार नसल्याने यावेळी काँग्रेसने हा मतदारसंघ आपल्याकडे खेचला होता. यावेळी काँग्रेसच्या अर्चना अरुण जाणवेकर विजयी झाल्या होत्या. २0१२ ला मतदारसंघ पुन्हा खुला झाला. यावेळी राष्ट्रवादीचे अरुण इंगवले विरुद्ध जनसुराज्य पक्षाचे अजित पाटील यांच्यात लढत होऊन इंगवले विजयी झाले होते.
हातकणंगले जिल्हा परिषद मतदारसंघ यावेळी नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित झाल्यापासून इच्छुकांनी तयारी सुरू केली होती. मात्र, ज्येष्ठ जिल्हा परिषद सदस्य अरुण इंगवले यांनी आपला कुणबी जातीचा दाखला काढल्यापासून या मतदारसंघातील राजकारण आणि राजकीय समीकरणे बदलून गेली आहेत. यामध्ये भर पडली ती अरुण इंगवले यांनी राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये प्रवेश केल्याची. अरुण इंगवले यांनी भाजपमध्ये जाऊन या मतदारसंघात कमालीची चुरस निर्माण केली आहे. अरुण इंगवले यांच्याबाबतीत पक्ष कोणताही असो त्याचा गटाच महत्त्वाचा ठरतो. गेल्यावेळी विरोधात असलेला जनसुराज्य यावेळी भाजप आघाडीमध्ये असल्याने तसेच हातकणंगले आणि सावर्डे पंचायत समिती जनसुराज्यला दिल्याने या निवडणुकीत अरुण इंगवले यांची जमेची बाजू ठरत आहे. भाजप-जनसुराज्य आघाडीने हातकणंगले पं. स.मध्ये जनसुराज्यचे विजय निंबाळकर यांना, तर सावर्डे पं.स.मधून अशोक नंरदेकर यांना संधी दिली आहे.
हातकणंगले जिल्हा परिषद मतदारसंघात काँग्रेस पक्षाने संदीप कारंडे यांना उमेदवारी दिली आहे. हातकणंगले पंचायत समिती स्वाभिमानीला देऊन काँग्रेसने सावर्डे पंचायत समिती आपल्याकडे ठेवून मतदारसंघातील गणिते बदलून टाकली आहेत. हातकणंगले पंचायत समितीमध्ये स्वाभिमानीने प्रवीण जनगोडा यांना संधी दिली आहे. तर सावर्डे पंचायत समितीमध्ये काँग्रेसने नंरदेचे माजी सरपंच राजकुमार भोसले यांना संधी दिली आहे.
मतदारसंघात शिवसेनेने मतदारसंघाबाहेरील माणगाववाडीचा उमेदवार दिल्यामुळे स्थानिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. हातकणंगले पंचायत समितीसाठी चंद्रकांत जाधव, तर सावर्डे पंचायत समितीसाठी सुनील चव्हाण यांना संधी दिली आहे. हातकणंगले जिल्हा परिषद मतदारसंघात चेहरा तोच, मात्र पक्ष वेगळा आणि राजकारणात कसलेला पैलवान अरुण इंगवले विरूद्ध नवी कोरी पाटी असलेले काँग्रेसचे संदीप कारंडे अशी काटा जोड लक्षवेधी लढत होत आहे.