जिल्ह्यात खरीप पेरणीची धांदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:18 IST2021-06-01T04:18:45+5:302021-06-01T04:18:45+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात खरीप पेरणीची धांदल उडाली आहे. भाताच्या धूळवाफ पेरणीला गती आली असून, दोन ...

Haste of kharif sowing in the district | जिल्ह्यात खरीप पेरणीची धांदल

जिल्ह्यात खरीप पेरणीची धांदल

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात खरीप पेरणीची धांदल उडाली आहे. भाताच्या धूळवाफ पेरणीला गती आली असून, दोन दिवसांत माॅन्सून केरळमध्ये दाखल होणार असल्याने शेतकऱ्यांची लगबग वाढली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात भात व सोयाबीनची १०७१ हेक्टरमध्ये पेरणी झाली असून, आगामी आठ दिवसांत गती वाढणार आहे.

यंदा माॅन्सून जूनच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रात दाखल होईल, असा हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे खरीप पेरणीपूर्व मशागत व पेरणीसाठी धांदल उडाली आहे. जिल्ह्याच्या पश्चिमेकडील तालुक्यात भाताच्या धूळवाफ पेरण्या मोठ्या प्रमाणात केल्या जातात. त्याचबरोबर पूर्वेकडील तालुक्यात सोयाबीनची पेरणी करून पाणी दिले जाते. त्यात गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात थोडा फरक पडला आहे. पावसाळी वातावरण होऊ लागल्याने शेतकऱ्यांची लगबग वाढली आहे.

पेरणीपूर्व मशागत करणे, बांध धरणे, शिवारातील चोतकाट वेचणे, भात पेरणीत शेतकरी मग्न आहे. आगामी आठ दिवसांत पेरणीला गती येणार आहे. जिल्ह्यात १ लाख ६३ हजार ३६८ हेक्टर खरिपाचे क्षेत्र आहे. त्यापैकी १ लाख ७ हजार हेक्टर भाताचे, तर ५२ हजार सोयाबीनचे क्षेत्र आहे. आतापर्यंत भाताची ६१३ हेक्टरमध्ये तर, सोयाबीनचे ४५८ हेक्टर असे १०७१ हेक्टरमध्ये पेरणी झाली आहे.

दरम्यान, सोमवारपासून जिल्ह्यातील वातावरणात काहीसा बदल होत चालला आहे. सोमवारी दिवसभरात काही काळ ढगाळ वातावरण राहिले. पावसासारखे वातावरण झाले; मात्र पाऊस झाला नाही. कमाल तापमानात घट झाली असून, सोमवारी ३२ डिग्रीपर्यंत आले आहे. आज, मंगळवारपासूनही असेच वातावरण राहणार असले तरी कमाल तापमानात घट होत राहील. गुरुवारी (दि. ३) पावसाची शक्यता वर्तवली आहे.

फोटो ओळी :

कोल्हापूर जिल्ह्यात खरीप पेरणीपूर्व मशागत व भाताच्या धूळवाफ पेरणीसाठी शेतकऱ्यांची लगबग उडाली आहे. सांगरूळ (ता. करवीर) परिसरात डोंगरमाथ्यावर भाताच्या टोकण करण्यात मग्न असलेले शेतकरी. (फाेटो-३१०५२०२१-कोल-शेती व शेती०१)

Web Title: Haste of kharif sowing in the district