हसन मुश्रीफ म्हणाले, माता-भगिनी बनून माझा सांभाळ करा...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2019 00:12 IST2019-01-21T00:12:11+5:302019-01-21T00:12:15+5:30
सेनापती कापशी : वडिलांचे निधन झाले त्यावेळी मी १९ वर्षांचा होतो. आता नऊ दिवसांपूर्वी आईंचे निधन झाले. ४६ वर्षांनंतर ...

हसन मुश्रीफ म्हणाले, माता-भगिनी बनून माझा सांभाळ करा...
सेनापती कापशी : वडिलांचे निधन झाले त्यावेळी मी १९ वर्षांचा होतो. आता नऊ दिवसांपूर्वी आईंचे निधन झाले. ४६ वर्षांनंतर आमच्या घरात दु:खद घटना घडली. हजारो लोकांनी भेटून आमचे सांत्वन केले. त्या सर्वांचा मी आभारी आहे. आईच्या निधनानंतर मोठी पोकळी निर्माण झाली असून, आता तुम्हीच माता-भगिनी बनून माझा सांभाळ करा, असे भावनिक आवाहन करत आमदार हसन मुश्रीफ यांनी अश्रुंना वाट मोकळी केली.
ते सेनापती कापशी (ता.कागल) येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला व युवती मेळाव्यात बोलत होते.
मुश्रीफ म्हणाले, या मतदारसंघातील जनतेने राजकीय पार्श्वभूमी नसताना मला आमदार, मंत्री म्हणून काम करण्याची संधी दिली. या संधीचा उपयोग शासनाच्या योजना तळागाळात पोहोचवण्यासाठी केला. आता उर्वरित कामे व स्वप्न पूर्ण करण्यासाठी मला पुन्हा एकदा संधी द्या. खोटी आश्वासने देणाऱ्या भाजप सरकारला चारीमुंड्या चित केल्याशिवाय आता थांबायचं नाहीे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवती प्रदेश अध्यक्ष सक्षना सलगर म्हणाल्या, भाजप सरकारने पाच वर्षांत फक्त आश्वासनच दिले. एकही ठोस काम झालेले नाही. आता तर डान्सबारला या सरकारने परवानगी दिली म्हणजे ‘गायीला वाचवा आणि बाईला नाचवा’ असे या सरकारचे धोरण आहे. या फसव्या भाजप सरकारला चलेजाव म्हणण्याची वेळ आली आहे.
येणारी निवडणूक संक्रमणाची आहे. देशाचा कायापालट करणारी निवडणूक असून, स्वाभिमानी रहा व भाजप सरकारला हद्दपार केल्याशिवाय आता स्वस्त बसायचं नाही, असे आवाहनही सलगर यांनी केले.
या मेळाव्याला सेनापती कापशी जिल्हा परिषद मतदारसंघातील महिलांची लक्षणीय उपस्थिती होती. यावेळी सभापती स्नेहल करंडे, आलाबादच्या सरपंच वंदना दिनेश मुसळे, गीतांजली पाटील, सरपंच सावित्री खतकल्ले, सरपंच शीतल फराकटे, मनिषा पाटील, आदींनी मनोगत व्यक्त केले.
नंद्याळ येथील नारायण आडेकर यांच्या नेतृत्वाखाली समरजित घाटगे गटाच्या कार्यकर्त्यांनी बाबूराव आस्वले, आण्णासाहेब आडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मुश्रीफ गटात प्रवेश केला.
यावेळी जि. प. सदस्य शिल्पा शशिकांत खोत यांनी स्वागत केले.
तालुका संघाचे संचालक शशिकांत खोत यांनी प्रास्ताविक तर सभापती राजश्री माने यांनी आभार मानले. भैया माने, युवराज पाटील, नाविद मुश्रीफ, जे. डी. मुसळे, परशराम शिंदे, अंकुश पाटील, सागर पाटील, राजू राजीगरे, मधुकर नाईक, पी. के. पाटील, आदींसह कार्यकर्ते व महिला उपस्थित होत्या.