उसाचे फड पेटविल्याने शेतकऱ्यांचे नुकसान
By Admin | Updated: March 31, 2015 00:26 IST2015-03-30T23:23:44+5:302015-03-31T00:26:32+5:30
उसाच्या वजनात घट : ऊस सोलण्यासाठी लागणारा वेळ वाचविण्यासाठी ऊस पेटविण्याचे प्रकार

उसाचे फड पेटविल्याने शेतकऱ्यांचे नुकसान
रमेश साबळे - कसबा तारळे -जिल्ह्यातील बहुतांशी साखर कारखान्यांचा गळीत हंगाम अंतिम टप्प्यात आला असून, या शेवटच्या टप्प्यात जास्तीत जास्त ऊस पदरात पाडून घेण्यासाठी ऊसतोड कामगारांची धावपळ सुरू आहे. परिणामी ऊस सोलण्यासाठी लागणारा वेळ वाचविण्यासाठी चक्क उसाचे फड पेटविण्याचे प्रकार सुरू आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. आधीच ऊसतोडीला विलंब झाल्याने कासावीस झालेल्या शेतकऱ्यांना पेटविलेल्या उसाकडे केविलवाण्या नजरेने पाहण्यापलीकडे दुसरा पर्याय नाही.कारखान्यांचा गळीत हंगाम शेवटच्या टप्प्यात आल्यानंतर ऊसतोड कामगारांची जास्तीत जास्त ऊस मिळविण्यासाठी धांदल उडते. यासाठी ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांनाही प्रोत्साहनपर बक्षिसे दिली जातात. परिणामी ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनमालकांबरोबर ऊसतोड कामगार या अंतिम टप्प्यात सर्वाधिक ऊस मिळविण्यासाठी जास्तीत जास्त उसाचे क्षेत्र मिळविण्यासाठी प्रयत्नशील असतात. ऊस तत्काळ कारखान्याला पाठविण्यासाठी रीतसर सोलला (खडसणे) जात नाही. उलट हा ऊस पाल्यासह पेटविला जातो. यामुळे भरउन्हात पेटणाऱ्या उसातून मोठ्या प्रमाणात रस बाहेर पडत असल्याने उसाच्या वजनात घट होते.तेरा-चौदा महिने पोटाच्या मुलासारखा ऊस सांभाळणाऱ्या शेतकऱ्यांच्या समोरच ऊस पेटविला जात असल्याने शेतकऱ्यांतून संताप व्यक्त होत आहे. ऊस पेटवू नये, यासाठी शेतकऱ्यांतून ऊसतोड कामगारांना खूश करण्यासाठी ‘प्रोग्राम’च्या गोंडस नावाखाली रोख रक्कम दिली जात आहे. परंतु, ज्यांचे उसाचे क्षेत्र कमी आणि अडचणीच्या ठिकाणी आहे, असे शेतकरी तर ऊस तोडणी कामगारांसाठी जास्त फायदेशीर ठरत आहेत.