कडकडीत ऊन, मध्येच पावसाची भुरभुर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:17 IST2021-07-02T04:17:30+5:302021-07-02T04:17:30+5:30
कोल्हापूर : एकदम अंग पोळणारे ऊन, मध्येच आभाळ भरून येते आणि पावसाची भुरभुर सुरू होते. क्षणात ऊन आणि क्षणात ...

कडकडीत ऊन, मध्येच पावसाची भुरभुर
कोल्हापूर : एकदम अंग पोळणारे ऊन, मध्येच आभाळ भरून येते आणि पावसाची भुरभुर सुरू होते. क्षणात ऊन आणि क्षणात पावसाळा असा लहरी पावसाचा अनुभव गुरुवारी कोल्हापूरकरांनी घेतला. दिवसभर ऊन तापले असताना संध्याकाळी रिमझिम पाऊस झाला; पण सध्या पिकांची गरज पाहता हा पाऊस पुरेसा नसल्याने शेतकरी चिंतातुर असून पिके जगवण्याची धडपड सुरू झाली आहे.
जूनच्या पहिल्या पंधरवड्यात पाऊस पडून गेल्यानंतर पावसाने दडीच मारली आहे. अधून मधून हलक्याशा कोसळणाऱ्या सरी एवढाच काय तो दिलासा आहे; पण आता पिके वाढीच्या व काही ठिकाणी उशिरा पेरा झालेली उगवणीच्या अवस्थेत असल्याने पावसाची गरज आहे. सुरुवातीला बरी वाटणारी उघडीप आता नकोशी वाटू लागली आहे. भुईमूग, सोयाबीनसह मूग, उडीद पिके चांगली उगवून आली असून वाढीच्या अवस्थेत असल्याने त्यांना पाण्याची जास्त गरज आहे; पण पाऊस नसल्याने वाढीवर परिणाम झाला आहे.
माळरानावरील पिकांची वाढ थांबली आहे. भात, नाचणी रोप लागणीची कामे तर पूर्णपणे ठप्प आहेत. अधून मधून येणारी भुरभुर पुरेशी नसल्याने सध्या लागणीची कामे थांबवण्यात आली आहेत.
पिकांची गरज वाढल्याने नदी व विहिरीवरील पाण्याच्या मोटारी पुन्हा सुरू होऊ लागल्या आहेत. पाऊस अजून चार पाच दिवस तरी येणार नसल्याचा हवामान खात्याचा अंदाज असल्याने शेतकऱ्यांनी पिके जगवण्यासाठीची धडपड सुरू केली आहे. कांडी धरलेल्या भाताला सध्या पाण्याची असलेली गरज ओळखून ते दिले जात आहे. सोयाबीन, भुईमुगाला मात्र पाणी देणे धोक्याचे असल्याने शेतकरी सध्या पाऊस पडेल आशेवर ढगाकडे डोळे लावून बसला आहे.