हातकणंगले, शिरोळ तालुकेच ‘लक्ष्य’

By Admin | Updated: November 29, 2015 00:56 IST2015-11-29T00:56:19+5:302015-11-29T00:56:19+5:30

विधान परिषदेचे राजकारण : दोन्ही तालुक्यांत १४६ मतदार; इच्छुकांच्या सर्वाधिक गाठीभेटी याच तालुक्यांत

Haratkanale, Shirol taluka's 'Goal' | हातकणंगले, शिरोळ तालुकेच ‘लक्ष्य’

हातकणंगले, शिरोळ तालुकेच ‘लक्ष्य’

कोल्हापूर : विधान परिषदेच्या उमेदवारीवरून काँग्रेस अंतर्गत जोरदार चढाओढ सुरू असली, तरी इच्छुकांच्या नजरा हातकणंगले व शिरोळ तालुक्यांवरच अधिक आहेत. या दोन्ही तालुक्यांत तब्बल १४६ मतदार आहेत. त्यामुळे उमेदवारी कोणालाही मिळो, बंडखोरी कोणीही करू दे, या दोन तालुक्यांतील मतदारच निकाल फिरविणार हे नक्की आहे. त्यामुळेच इच्छुकांच्या सर्वांधिक गाठीभेटी याच तालुक्यांत सुरू आहेत.
कोल्हापूर स्थानिक स्वराज मतदारसंघात महापालिका, जिल्हा परिषद, नगरपालिकांचे ३८२ मतदार आहेत. तालुकानिहाय मतदारांची संख्या पाहिली, तर हातकणंगले तालुक्यात सर्वाधिक ९३ मतदार आहेत. इचलकरंजी नगरपालिकेत ६२ नगरसेवक, वडगावमध्ये १९, जिल्हा परिषदेचे ११ व हातकणंगले सभापती १ असे ९३ मतदार आहेत. त्यानंतर शिरोळमध्ये जयसिंगपूर पालिकेमध्ये २५, कुरुंदवाडमध्ये १९ व जिल्हा परिषद, पंचायत समिती सभापती ९, असे ५३ मतदार आहेत. या दोन्ही तालुक्यांत १४६ मतदार आहेत. विजयासाठी १९१ ची मॅजिक फिगर गाठावी लागणार आहे. त्यातील १४६ मते या दोन तालुक्यांत आहेत. त्यामुळेच हातकणंगले व शिरोळ तालुक्यांकडे इच्छुकांचे अधिक लक्ष आहे. या बळावरच माजी मंत्री प्रकाश आवाडे, राजेंद्र पाटील-यड्रावकर व आमदार महादेवराव महाडिक यांनी शड्डू ठोकला आहे. महाडिक यांनी या दोन तालुक्यांतील मतदारांशी तिसऱ्या वेळेला गाठीभेटी सुरू केल्या आहेत.
हातकणंगले, शिरोळपाठोपाठ कोल्हापूर महापालिकेचे ८१ मतदार आहेत. कागल तालुक्यात ४४, तर सर्वांत कमी गगनबावडा तालुक्यात ३ मतदार आहेत. शाहूवाडी, गडहिंग्लज, पन्हाळा तालुक्यांत प्रत्येकी २५ मतदार आहेत. राधानगरी व चंदगडमध्ये प्रत्येकी सहा, तर करवीरमध्ये १२ मतदार आहेत. आजरा तालुक्यात चार मतदार आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Haratkanale, Shirol taluka's 'Goal'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.