सौते ग्रामस्थ पाणीसाठी हैराण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:26 IST2021-03-27T04:26:16+5:302021-03-27T04:26:16+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मलकापूर : सौते गावाच्या पाचशे ते सातशे मीटर अंतरावर कडवी नदी भरून वाहत आहे. तरीदेखील गावातील ...

सौते ग्रामस्थ पाणीसाठी हैराण
लोकमत न्यूज नेटवर्क
मलकापूर : सौते गावाच्या पाचशे ते सातशे मीटर अंतरावर कडवी नदी भरून वाहत आहे. तरीदेखील गावातील नागरिकांना एक दिवसाआड पाणी मिळत आहे. मिळत असलेले पाणी दूषित आहे, असा ग्रामस्थांचा आरोप असून जिल्हा परिषदेच्या ग्रामीण नळ पाणीपुरवठा कार्यालयाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.
ग्रामीण नळ पाणीपुरवठा कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांना पाण्याची सोय करावी अन्यथा त्यांच्या कार्यालयासमोर ग्रामस्थ आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत.
शाहूवाडी तालुक्याच्या ठिकाणापासून पंधरा किलोमीटर अंतरावर मलकापूर- सरूड रस्त्यावर सौते गाव वसले आहे. गावची लोकसंख्या दीड हजाराच्या आसपास आहे. गावातील ग्रामस्थांना नेहमी पाणीटंचाई जाणवत होती. त्यामुळे २०११ साली शासनाने गावात नळ पाणीपुरवठा योजना राबविण्यासाठी ३५ लाख रुपये मंजूर केले होते. सदर योजनेचे काम जिल्हा परिषदेच्या ग्रामीण नळपाणी पुरवठा कार्यालयाच्या अंतर्गत सुरू होते. ठेकेदाराने कडवी नदीपात्रात जॅकवेल बांधले. मात्र, सदर योजनेचे काम म्हणावे तसे झालेले नाही, असा ग्रामस्थांचा आरोप आहे. नदी भरून वाहू लागली की, जॅकवेलला पाणी असते. सध्या कडक उन्हाळा सुरू आहे. त्यामुळे कडवी नदीचे पाणी पात्रात गेले आहे. त्यामुळे जॅकवेलला पाणी नसल्यामुळे ग्रामस्थांना दूषित पाणी प्यावे लागत आहे. नदीपात्राचे पाणी खाली गेल्यामुळे अधिकाऱ्यांनी जॅकवेलला बोगदा पाडून नदीचे पाणी आत सोडले आहे. त्यामुळे ग्रामस्थांना दूषित पाणी प्यावे लगत आहे. जॅकवेलशेजारी जनावरे पाण्यात घालून धुतली जात असतात. तेच शेणमिश्रित पाणी जॅकवेलमध्ये खोदलेल्या खड्ड्यातून जात आहे. त्यामुळे पारदर्शकतेचा टेंभा मिरवणाऱ्या नळ पाणीपुरवठा कार्यालयाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. सौते ग्रामस्थांनी लोकशाही दिनात तक्रार केली होती. शाहूवाडी तालुक्यातील अनेक वाड्या- वस्त्यांवर पाणीटंचाई जाणवत आहे. मात्र, अधिकारी कागदी घोडे नाचवून शासनाला खोटा अहवाल पाठविला जातो. जनता मात्र पाणीटंचाईपासून हैराण होत आहे.