‘हरळी’करांच्या निर्णयामुळे महिलांमध्ये संताप !
By Admin | Updated: December 8, 2015 00:50 IST2015-12-08T00:49:33+5:302015-12-08T00:50:08+5:30
दारूबंदीला हरताळ : चळवळीतील कार्यकर्ते पुन्हा आक्रमक

‘हरळी’करांच्या निर्णयामुळे महिलांमध्ये संताप !
राम मगदूम --- गडहिंग्लज महिलांनी बहुमताने देशी दारू दुकान बंद केलेल्या हरळी बुद्रुक येथे बीअर बार व परमीट रूम सुरू करण्यास परवानगी देण्याचा ठराव बहुमताने ग्रामसभेत मंजूर करून घेण्यात आला. त्यामुळे महिलांच्या मतदानाने दारूबंदी झालेल्या गडहिंग्लज तालुक्यातील १० गावांतील महिलांच्या मनात संतापाची भावना निर्माण झाली आहे.
२००९ मध्ये हरळी बुद्रुक आणि हरळी खुर्द या गावातील देशी दारू दुकान बंद करण्याचा निर्णय महिलांच्या मतदानाने बहुमताने झाला. त्यानंतर दोनवेळा ग्रामपंचायतीची निवडणूक झाली. दोनही वेळेला ‘दारू’च्या समर्थकांचीच सत्ता हरळी बुद्रुक ग्रामपंचायतीवर आली. त्यामुळे बंद झालेली ‘देशी’ पुन्हा ‘वेशी’त आणण्याचा खटाटोप सुरू झाला. त्यासाठी एकदा ‘ग्रामसभा’ झाल्याची खोटी कागदपत्रेही रंगविण्यात आली. मात्र, दारूबंदी चळवळीतील कार्यकर्त्यांनी तो हाणून पाडला.
दरम्यान, आठवड्यापूर्वी झालेल्या ग्रामसभेत गावात बीअर बार सुरू करण्यास परवानगी देण्याचा ठराव बहुमताने मंजूर करून घेण्यात आला. त्या विरोधात आंदोलनाचा इशारा ‘जिल्हा दारूबंदी समिती’ आणि ‘मनसे’च्या कार्यकर्त्यांनी दिला आहे.
प्रांतांचा आदेशही बेदखल
जिल्ह्यात आचारसंहिता सुरू असताना हरळीत ग्रामसभा घेतली कशी? त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची पूर्व परवानगी घेतली होती का? या मुद्द्यांच्या खुलाशासह ग्रामसभेचे व्हिडिओ शूटिंग आणि सभेच्या कामकाजाचा अहवाल ३ डिसेंबरपूर्वी सादर करण्याचा आदेश प्रांताधिकाऱ्यांनी ग्रामसेवकांना
दिला होता. तलाठ्याकरवी पाठविलेला हा आदेश परत आला. त्यानंतर ‘बीडीओ’मार्फत आदेश बजावण्यात आला. परंतु, त्यालाही प्रतिसाद न मिळाल्यामुळे प्रांतांनी सोमवारी बीडीओंना ‘स्मरणपत्र’ पाठविले आहे.
माता-भगिनींच्या भावनांचे काय?
८ वर्षांपूर्वी ‘उभी’ बाटली ‘आडवी’ करण्याची चळवळ मुगळीतून सुरू झाली. हसूरचंपूचा अपवाद वगळता १० गावांत त्यास यश आले. प्रसंगी मजुरी बुडवून मुला-बाळांच्या उज्ज्वल भविष्यासाठी महिलांनी झटून आडवी केलेली बाटली अधिकृतरीत्या उभी करण्याचा प्रयत्न हरळीत सुरू आहे. त्याचे लोण जिल्ह्यात अन्यत्र पसरू नये म्हणून दारूबंदी चळवळीतील कार्यकर्त्यांनी पुन्हा कंबर कसली आहे.
महिलांच्या भावनांचा अनादर आणि गावच्या विकासासाठी मिळालेल्या सत्तेचा गैरवापर करून पुन्हा दारू दुकान सुरू करण्याचा प्रयत्न हरळीत झाला आहे. त्यामुळे दारूबंदी झालेल्या गावात पुन्हा दारू दुकानास परवानगी मिळू नये, यासाठी व्यापक समाजप्रबोधनाची गरज आहे.
- कॉ. उज्ज्वला दळवी, गडहिंग्लज दारूबंदी चळवळ कार्यकत्या
महिलांच्या मतदानाने दारूबंदी झालेली गावे
२१ जानेवारी २००७ - मुगळी
१२ आॅगस्ट २००७ - दुंडगे
१८ सप्टेंबर २००९ - हरळी बुद्रुक
१८ सप्टेंबर २००९ - हरळी खुर्द
३ आॅगस्ट २०१० - नांगनूर
६ आॅक्टोबर २०१० - इंचनाळ
१४ डिसेंबर २०१० - अत्याळ
१७ जून २०११ - मुत्नाळ
३० नोव्हेंबर २०११ - कळविकर्ट्टे.