‘रमजान ईद’ मुबारक हो !
By Admin | Updated: July 18, 2015 00:13 IST2015-07-17T23:48:43+5:302015-07-18T00:13:51+5:30
आज ईद : मुस्लिम बोर्डिंग येथे साडेनऊ वाजता नमाज पठण

‘रमजान ईद’ मुबारक हो !
कोल्हापूर : मुस्लिम बांधवांचा रमजान ईद हा सण आज, शनिवारी सर्वत्र साजरा होत आहे. यानिमित्त मुस्लिम बोर्डिंगच्या पटांगणावर सकाळी साडेनऊ वाजता मुफ्ती इर्शाद कुन्नुरे हे पहिल्या जमातसाठी नमाज व खुदबा पठण करणार आहेत. सणाच्या पूर्वसंध्येला पावसाचा अंदाज घेत मुस्लिम बांधवांनी ईदसाठीच्या साहित्य, कपड्यांची खरेदी केली.
सालाबादप्रमाणे हिलाल कमिटी (चाँद कमिटी) ची बैठक मौलाना मन्सूर आलम कासमी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यात मुंबई, लखनौ, रत्नागिरी, हैदराबाद तसेच अन्य शहरांशी संपर्क साधण्यात आला. तेथे चंद्र दर्शनाची साक्ष मिळाल्याने आज, शनिवारी ईद साजरी करण्याचा निर्णय झाला. यावेळी मौलाना अब्दुल सलाम कासमी, बशीर नायकवडी, मौलाना नाझीम, आदी उपस्थित होते. सणाच्या पूर्वसंध्येला शुक्रवारी ईदच्या खरेदीसाठी बाजारपेठा गजबजल्या होत्या. ईदच्या खरेदीसाठी बाजारपेठाही मोठ्या प्रमाणात सजल्या होत्या. पठाणी झब्बा आणि लेंगा, तरुणाईसाठी ब्रँडेड कपडे, अत्तर, ईदचा खास मेन्यू असणाऱ्या शिरकुर्म्यासाठी काजू, बदाम, पिस्ते, चारोळी, मनुका यांच्या खरेदीसाठी महापालिका परिसरातील दुकानांमध्ये मोठी गर्दी झाली होती. स्पेशल भाजक्या मिरज शेवया यासाठी महाद्वार रोड, राजारामपुरी, आदी ठिकाणीही खरेदीसाठी गर्दी झाली होती. ईदची खरेदी ‘एकाच छताखाली’ व्हावी, या उद्देशाने शहरातील विविध ठिकाणी ईद फेस्टिव्हल भरविले आहेत. याठिकाणी ‘ना नफा, ना तोटा’ या तत्त्वावर साहित्यांची विक्री केली जात असल्याने मुस्लिम बांधवांचा याठिकाणी खरेदी करण्याकडे जास्त ओढा होता. ( प्रतिनिधी )
शहरातील मस्जिदीमधील नमाज पठणाची वेळ
अकबर मोहल्ला मस्जिद :
सकाळी ८.३०
गवंडी मोहल्ला मस्जिद : ८.४५
कब्रस्तान मस्जिद, राजेबागस्वार, बाराईमाम, टाकाळा, रंकाळा मस्जिद, विक्रमनगर मस्जिद, बाबूजमाल मस्जिद : ९.००
उत्तरेश्वर मस्जिद : ९.१५
घुडणपीर मस्जिद, बडी मस्जिद, यादवनगर मस्जिद : ९.३०
कसाब मस्जिद, निहाल मस्जिद मर्कज : ९.४५