सागरच्या कर्तृत्वाला दातृत्वाचा हात
By Admin | Updated: August 3, 2014 01:47 IST2014-08-03T01:36:55+5:302014-08-03T01:47:30+5:30
‘वुई केअर-२४’ ग्रुप : २० हजारांची मदत; ‘लोकमत’च्या वृत्ताला ‘सोशल मीडिया’ची साथ

सागरच्या कर्तृत्वाला दातृत्वाचा हात
कोल्हापूर : सोशल मीडियाच्या गैरवापराबाबत तक्रारीचा सूर असताना याच सोशल मीडियाद्वारे समाजातील गरजू, गरीब आणि निराधारांना मदतीचा हात मिळवून दिला जाऊ शकतो याचा प्रत्यय कोल्हापुरातीलच ‘वुई केअर-२४’ या व्हॉटस अॅप ग्रुपने दाखवून दिला आहे.
‘लोकमत’च्या हॅलो कोल्हापूर पान १ वर शुक्रवारी ‘सागरला हवाय मदतीचा हात’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध झाले होते. सागर शहाजी वीर या निराधार तरुणाच्या महत्त्वाकांक्षेला बळ देणारे आणि त्याला मदत मिळवून देण्यासाठी असलेले हे वृत्त ‘वुई केअर-२४’ या ग्रुपचे सदस्य मिलिंद धोंड यांनी व्हॉटस अॅपच्या माध्यमातून आपल्या ग्रुपला शेअर केले. त्यानंतर त्यांनी ग्रुपला मदतीसाठी आवाहन केले. अवघ्या काही मिनिटांतच वीस हजार रुपयांची आर्थिक मदत गोळा केली. एवढेच नाही, तर त्यांनी ‘एनजीओ कम्पँसिएशन-२४’ या ग्रुपतर्फे सागरच्या अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाचा दोन वर्षांचा खर्चही उचलला.
दहावीच्या परीक्षेत ८२ टक्के गुण मिळविलेल्या सागर याला अभियांत्रिकी क्षेत्रात करियर करायचे होते; पण आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने त्याचे शिक्षण घेण्याची इच्छा पूर्ण होईल की नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली. त्यावेळी डॉ. बापूजी साळुंखे अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्राध्यापकांनी त्याला मदतीचा हात पुढे केला; पण तरीही आर्थिक गरज होती. त्यामुळे पुन्हा एकदा त्याच्या इच्छेला मुरड घालावी लागणार होती. यावेळी ‘लोकमत’ त्याच्या मदतीला धावले. ‘वुई केअर-२४’ या ग्रुपमधील देवेंद्र दिवाण, अॅड. इंद्रजित चव्हाण, सागर बगाडे, उत्तम फराकटे, अॅड. गुंड पाटील, तुषार चोपडे, संदीप नष्टे, राकेश अंदानी, गौरी शिरोडकर, ऋषिकेश खोत, श्याम नोटाणी, अनंत खासबागदार, विलास रेडेकर, अस्पाक आजरेकर, कुलदीप शिंगटे, अजित साळोखे, रत्नेश शिरोळकर, अमर बागी, विकास प्रभू, सुशील चंदवाणी यांनी आर्थिक मदत केली. तसेच या ग्रुपने ‘लोकमत’ कार्यालयात येऊन सागरला मदत दिली.
यावेळी ‘लोकमत’चे सरव्यवस्थापक मकरंद देशमुख, संपादक वसंत भोसले यांच्यासह ‘वुई केअर-२४’ या ग्रुपचे सर्व सदस्य उपस्थित होते.