हमीदवाडा-बेनिक्रे रस्ता निकृष्ट दर्जाचाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:54 IST2020-12-05T04:54:31+5:302020-12-05T04:54:31+5:30
कुमार मोरबाळे यांचा आरोप : कारवाईची मुश्रीफ यांच्याकडे मागणी म्हाकवे : हमीदवाडा-बेनिक्रे रस्त्याचे काम पूर्ण होऊन दोन महिने ...

हमीदवाडा-बेनिक्रे रस्ता निकृष्ट दर्जाचाच
कुमार मोरबाळे यांचा आरोप : कारवाईची मुश्रीफ यांच्याकडे मागणी
म्हाकवे : हमीदवाडा-बेनिक्रे रस्त्याचे काम पूर्ण होऊन दोन महिने होण्यापूर्वीच हा रस्ता अनेक ठिकाणी उखडला असून, खड्डे पडले आहेत. याबाबत लेखी तक्रारी झाल्या होत्या. त्यामुळे वरिष्ठांनी कागल पं. स. बांधकाम विभागाचे उपअभियंता चांदणे यांना या रस्त्याच्या कामाची चौकशी करण्याचे आदेश दिले. मात्र, चांदणे यांनी प्रत्यक्ष पाहणी न करताच हा रस्ता दर्जेदार झाल्याचा खोटा अहवाल दिला आहे. त्यामुळे या कामासह संबंधित अधिकाऱ्याच्या कामकाजाचीही चौकशी व्हावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते कुमार मोरबाळे यांनी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर या रस्त्याला निधी मंजूर होऊन रस्ता करण्यात आला. मात्र, ठेकेदारांचा मनमानी कारभार, अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे हे काम निकृष्ट दर्जाचे झाले. त्यामुळे खड्डे जैसे थे पडत आहेत. तसेच, बाजूपट्टया भरण्यासाठी मातीचा वापर केला आहे असे असतानाही या रस्त्याचा दर्जा चांगला आहे, कोठेही खचलेला नाही, खड्डे पडलेले नसून, समपातळीत आहे, असा अहवाल चांदणे यांनी कार्यकारी अभियंता कांडगावे यांना दिला आहे.
दरम्यान, चांदणे यांनी प्रत्यक्ष पाहणी न करता केवळ ठेकेदाराला पाठीशी घालण्याच्या हेतूनेच ही खोटी माहिती दिल्याचेही मोरबाळे यांचे म्हणणे आहे. त्यामुळे मुश्रीफ याबाबत काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.