कोथळीजवळ खुनीहल्यात हमाल गंभीर
By Admin | Updated: July 6, 2014 00:20 IST2014-07-06T00:19:57+5:302014-07-06T00:20:15+5:30
उपचारासाठी सी. पी. आर.मध्ये दाखल

कोथळीजवळ खुनीहल्यात हमाल गंभीर
सडोली (खालसा) : कोथळी-हळदी दरम्यान अज्ञात व्यक्तीने खुनी हल्ला केल्याने बच्चाराम शंकर पाटील (वय ३५, रा. म्हाळुंगे, ता. करवीर) हे हमाल गंभीर जखमी झाले आहेत. हा हल्ला आज, शनिवारी दुपारी १२ वाजता झाला. म्हाळुंगे येथील बच्चाराम पाटील हे कामानिमित्त म्हाळुंगेहून कुरुकली मार्गे पायी हळदीकडे जात होते. कोथळी-हळदी दरम्यान ओढ्याजवळ कोल्हापूरहून दुचाकीवरून आलेल्या अज्ञात व्यक्तीने पाटील यांच्या डोक्यावर व मानेवर धारदार शस्त्राने खुनी हल्ला केल्याने ते जखमी अवस्थेत रस्त्याच्या कडेला पडले होते. कोणीतरी मद्यपान करून पडले असेल म्हणून त्यांच्याकडे येणाऱ्या-जाणाऱ्यांनी दुर्लक्ष केले. सायंकाळी चार वाजता म्हाळुंगे गावच्या ग्रामस्थाने त्यांच्याजवळ जाऊन पाहिले असता ते जखमी अवस्थेत आढळून आले. त्यांना हळदी येथील रुग्णालयामध्ये नेले; परंतु वार खोलवर झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी सी. पी. आर.मध्ये दाखल केले. यावेळी बच्चाराम पाटील यांनी दुचाकीवरून आलेल्या अज्ञात व्यक्तीने तोंडावर रुमाल बांधला असल्याचे सांगितले. हल्ल्यानंतर तो भरधाव वेगाने निघून गेल्याचेही पोलिसांना सांगितले. बच्चाराम पाटील हे कोथळी (ता. करवीर) येथे जखमी अवस्थेत सुमारे चार तास रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. एकाही व्यक्तीने माणुसकी न दाखविल्याने जखमी अवस्थेत पडले होते.(वार्ताहर)