हाळवणकर, यड्रावकर ‘सेफ’
By Admin | Updated: September 30, 2014 01:04 IST2014-09-30T00:55:14+5:302014-09-30T01:04:21+5:30
छाननीत अर्ज वैध : ‘दक्षिण’मधून राष्ट्रवादीच्या दुर्वास कदम यांचा अर्ज अवैध

हाळवणकर, यड्रावकर ‘सेफ’
कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीसाठी आज, सोमवारी झालेल्या छाननीत जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या इचलकरंजी मतदारसंघात आमदार सुरेश हाळवणकर यांचा अर्ज वैध ठरला, तर शिरोळ मतदारसंघात डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर हेच राष्ट्रवादी पक्षाचे अधिकृत उमेदवार असल्याचा निर्णय देण्यात आला.
‘कोल्हापूर दक्षिण’मधील राष्ट्रवादीचे उमेदवार दुर्वास कदम यांचा अर्ज अवैध ठरल्याने या मतदारसंघात राष्ट्रवादीचे घड्याळ दिसणार नाही. जिल्ह्यातील १० मतदारसंघांत ३० अर्ज अवैध ठरले, तर २८० अर्ज वैध ठरले.
आज, सोमवारी सकाळी ११ वाजता तहसील व प्रांत कार्यालयांत अर्ज छाननीच्या प्रक्रियेस सुरुवात झाली. सुरेश हाळवणकर यांच्या वीज चोरी प्रकरणातील शिक्षा व दोषित्वाला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने त्यांची उमेदवारी वैध ठरविण्याचा निर्णय निवडणूक निर्णय अधिकारी अश्विनी जिरंगे यांनी दिला. तब्बल तीन तास या हरकतीसंदर्भात सुनावणी झाली.
‘शिरोळ’मध्ये राष्ट्रवादीने राजेंद्र पाटील-यड्रावकर व जि.प.चे सदस्य धैर्यशील माने या दोघांना ए. बी. फार्म दिला होता. दोन्ही उमेदवारांच्या कायदेतज्ज्ञांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसमोर बाजू मांडली. यात प्रथम अर्ज दाखल केलेल्या यड्रावकर यांनी बाजी मारली. बुधवारी (दि. १) दुपारी मतदारसंघातील चित्र स्पष्ट होणार आहे.