राष्ट्रवादीच्या यादीत निम्मे नवीन चेहरे
By Admin | Updated: July 15, 2014 01:00 IST2014-07-15T00:57:12+5:302014-07-15T01:00:45+5:30
युवक, युवतींना संधी : शरद पवार यांचे धोरण; सर्वेक्षण सुरू; आठ दिवसांत अहवाल देणार

राष्ट्रवादीच्या यादीत निम्मे नवीन चेहरे
राजाराम लोंढे- कोल्हापूर ,, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या उमेदवार यादीत ४० टक्के नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाणार आहे. यामध्ये युवकांसह युवतींचा समावेश केला जाणार आहे तसे धोरण पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी तयार केले असून, त्यानुसार गोपनीय सर्वेक्षण सुरू आहे. त्याचा अहवाल येत्या आठ-दहा दिवसांत प्रदेशाध्यक्षांकडे पाठविला जाणार असल्याचे सूत्रांकडून समजते.
लोकसभा निवडणुकीतील पराभव राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या जिव्हारी चांगलाच लागला आहे. विरोधकांचे हल्ले परतावून लावण्यासारखे काँग्रेसकडे फारसे ताकदीचे नेते नसल्याने विधानसभेच्या निवडणुकीची सर्व सूत्रे आपल्या हातात घेण्याची तयारी त्यांनी सुरू केली आहे. मतदारसंघनिहाय त्यांनी स्वबळावर लढल्यानंतर काय समीकरणे तयार होतील, त्याचा फायदा नेमका कोणाला होईल. याबाबत अहवाल मागवला आहे. मध्यंतरी युवकांचा मेळावा घेऊन अनेक जागांबाबत खुद्द शरद पवार यांनीच चाचपणी केली होती. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या उमेदवार यादीत ४० टक्के युवक, युवतींसह विविध प्रवर्गाचा समावेश करण्यासाठी प्रयत्न आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात आघाडी केली तर किमान पाच जागा पदरात पाडून घ्यायच्या आणि त्यातील किमान दोन महिला व युवकांना संधी देण्याचे निश्चित आहे.
कागल - हसन मुश्रीफ
राधानगरी- के. पी. पाटील
चंदगड- नंदिनी बाभूळकर, बी. एन. पाटील-मुगळीकर, रामराजे कुपेकर
शिरोळ - राजेंद्र पाटील-यड्रावकर, विठ्ठलराव नाईक -निंबाळकर
इचलकरंजी- धैर्यशील माने, अशोक स्वामी, अशोकराव जांभळे
हातकणंगले -अशोकराव माने, किशोर कोरगांवे किंवा जनसुराज्य मित्रपक्ष
पन्हाळा-शाहूवाडी- भारत पाटील, रणवीरसिंग गायकवाड, किंवा जनसुराज्य मित्रपक्ष
उत्तर- मधुरिमाराजे छत्रपती, आर. के. पोवार (शहरातील इच्छूकही संपर्कात)
दक्षिण -अरुंधती महाडिक, राजलक्ष्मी खानविलकर, प्रताप कोंडेकर
करवीर- धैर्यशील पाटील-कौलवकर, मधुकर जांभळे, पी. जी. शिंदे
(या यादीवर नजर टाकल्यास किमान सात मतदारसंघात
राष्ट्रवादीचे उमेदवार बेताचेच असल्याचे स्पष्ट दिसते)
मधुरिमाराजे यांच्या नावाची चर्चा
माजी आमदार मालोजीराजे यांचे निवडणुकीबाबत ‘नरो वा कुंजरोवा’ अशी परिस्थिती आहे. त्यामुळे काँग्रेसमधून त्यांचे नाव मागे पडू लागले आहे. पण जागावाटपात ही जागा आपल्याकडे घेऊन तेथून त्यांच्या पत्नी व दिवंगत नेते दिग्विजय खानविलकर यांच्या कन्या मधुरिमाराजे यांना रिंगणात उतरण्याच्या हालचाली राष्ट्रवादीच्या पातळीवर सुरू आहेत.
रामराजेंना लिफ्ट..संग्रामला डच्चू
चंदगडच्या उमेदवारीवरून कुपेकर कुटुंबीयांमध्ये उभी फूट पडली आहे. आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी नंदिनी बाभूळकर यांचे नाव पुढे केल्याने संग्राम कुपेकर यांनी बंडाचे निशाण फडकवले आहे. ‘एव्हीएच प्रकल्प’, ‘दौलत’च्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक सत्ताधाऱ्यांना जड जाणार आहे. हा वाद मिटवण्याची जबाबदारी खासदार धनंजय महाडिक यांच्यावर सोपवली असली तरी सर्वमान्य तोडगा म्हणून बी. एन. पाटील-मुगळीकर व रामराजे कुपेकर यांची नावे पुढे येऊ शकतात. यादीत रामराजे याचे नाव असले तरी संग्राम कुपेकर यांचा मात्र उल्लेखच नाही.