घावरेवाडीजवळ अर्धा एकर डोंगर खचला

By Admin | Updated: July 31, 2014 23:25 IST2014-07-31T23:17:37+5:302014-07-31T23:25:45+5:30

प्रशासकीय यंत्रणा सतर्क : डागडुजीनंतर गारगोटी-वेंगरूळ मार्ग खुला

Half an acre hill near Ghavarewadi | घावरेवाडीजवळ अर्धा एकर डोंगर खचला

घावरेवाडीजवळ अर्धा एकर डोंगर खचला

गारगोटी : भुदरगड तालुक्यातील गारगोटी-वेंगरूळ मार्गावरील घावरेवाडी फाट्यानजीक आज, गुरुवारी अर्धा एकर जमिनीसह डोंगर खचल्यामुळे लोकांत घबराट निर्माण झाली. दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याची डागडुजी करून रस्ता वाहतुकीस खुला केला.
आज, गुरुवारी सायंकाळच्या सुमारास रस्त्यासह शेतजमिनीला शंभर फूट भली मोठी भेग पडली. त्यामुळे या परिसरात होणारी वाहतूक पूर्णत: बंद झाली होती. ही घटना ताजी असतानाच आज पुन्हा शेतजमिनीसह अर्धा एकर डोंगर मोठ्या प्रमाणात खचल्याचे निदर्शनास आले. सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता के. डी. मद्याळे, शाखा अभियंता एस. बी. इंगवले, शाखा अभियंता एस. ए. सुतार यांच्यासह बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सकाळी सात वाजल्यापासून यंत्रसामग्री व फौजफाट्यासह रस्त्यामधील सुमारे चार ते पाच फूट खोलीची भेग बुजविली. रस्ता दुसऱ्या ठिकाणी खचल्याचे आज सकाळी निदर्शनास आले. हा भागही बुजविण्यात आला आहे. डोंगरातून मोठ्या प्रमाणात येणाऱ्या पाण्याचा प्रवाह खुदाई करून इतरत्र वळविण्यात आला आहे.
मात्र, हे काम सुरू असताना शेजारील अर्धा एकर शेतजमिनीसह डोंगर खचल्याचे नागरिकांना दिसून आले. ऊसशेती असलेली शेती सुमारे तीन फूट खोल खचली होती, तर ऊस शेतीवरील डोंगर हा मोठ्या प्रमाणात खचल्याचे आढळून आले. ही माहिती प्रशासनास समजताच शासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली. प्रांताधिकारी अजय पवार, तहसीलदार शिल्पा ओसवाल, पंचायत समितीचे उपसभापती विश्वनाथ कुंभार यांनी तातडीने परिस्थितीचे गांभीर्य
ओळखून ठोस उपाययोजना करण्याबाबत वरिष्ठांना माहिती दिल्याचे समजते. दरम्यान, जमीन खचल्याचे पाहण्यासाठी स्थानिक रहिवाशांनी मोठी गर्दी
केली होती. (प्रतिनिधी)

Web Title: Half an acre hill near Ghavarewadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.