गारांच्या पावसाने कोल्हापूरला झोडपले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:30 IST2021-04-30T04:30:05+5:302021-04-30T04:30:05+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोल्हापूर शहराला गुरुवारी सायंकाळी गारांच्या पावसाने अक्षरश: झोपडून काढले. गारांचा एवढा वर्षाव होतो, रस्त्यांवर ...

गारांच्या पावसाने कोल्हापूरला झोडपले
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोल्हापूर शहराला गुरुवारी सायंकाळी गारांच्या पावसाने अक्षरश: झोपडून काढले. गारांचा एवढा वर्षाव होतो, रस्त्यांवर गारांचा सडा पडला होता. तब्बल पाऊण तास एकसारखा पाऊस झाल्याने शहरातील सखल भागांत पाणीच पाणी झाले हाेते.
कोल्हापूर जिल्ह्यांत गेली दोन दिवस ढगाळ वातावरण राहिले. काही ठिकाणी तुरळक तर जोरदार पाऊस झाला. गुरूवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण राहिले. सकाळी दहापर्यंत पावसाळी वातावरण राहिले. त्यानंतर ऊन पडले असले तरी उष्मा जाणवत होता. दुपारी एक वाजता तर अंग भाजून निघत होते. दुपारी चारनंतर पावसाचे वातवरण झाले, हळूहळू ढगांची दाटी होऊ लागली आणि सोसाट्याचे वारे सुरू झाले. सायंकाळी पाच वाजता वाऱ्यासह गारांचा वर्षाव होऊ लागला. गारांचा तडाखा इतका प्रचंड होता, की अंगावर गारा पडल्यानंतर त्याचा दणका जोरात बसत होता. पत्रे, खापऱ्यांवर गारा पडल्यानंतर कानठळ्या बसत होत्या.
गारांचा वर्षाव इतका मोठ्या प्रमाणात होता, त्यामुळे रस्त्यांवर गारांचा सडा पडला होता. पाऊण तास शहराला गारांच्या पावसाने झोडपून काढले. त्यानंतर पुन्हा ऊन पडले. या पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाल्याने उष्म्याने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला.
आजपासून तापमानात वाढ राहणार
कोल्हापुरात गुरुवारी किमान २२ तर कमाल ३६ डिग्री तापमान राहिले. मात्र, आजपासून तापमानात सरासरी दोन डिग्रीने वाढ होणार आहे. मात्र पावसाची शक्यता नसल्याचे हवामान विभागाचा अंदाज आहे.