कोल्हापुरात गारांचा वर्षाव
By Admin | Updated: May 10, 2015 01:08 IST2015-05-10T01:08:57+5:302015-05-10T01:08:57+5:30
वळवाने झोडपले : दिवसभर उष्मा, सायंकाळी पावसाचा थंडावा

कोल्हापुरात गारांचा वर्षाव
कोल्हापूर : वळीव पावसाने शनिवारी कोल्हापूर शहरासह जिल्ह्याला अक्षरश: झोडपून काढले. सोसाट्याच्या वाऱ्यांसह सुमारे पाऊणतास पाऊस झाल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. दिवसभर जीवघेण्या उष्म्याने हैराण झालेल्यांना सायंकाळी पावसाने थोडासा दिलासा दिला.
गेले आठ ते दहा दिवस वातावरणात कमालीचा उष्मा जाणवत आहे. सकाळी आठपासूनच अंगाला चटके बसतात. दहानंतर शरीरातून घामाच्या धारा सुरू होतात, तर दुपारी बारानंतर घराबाहेर
पडणे मुश्किल झाले आहे. रस्त्यावरून जाताना गरम वाफा अंगावर येत असल्याने नागरिकांना विशेषत: वयोवृद्ध नागरिकांना त्याचा कमालीचा त्रास होऊ लागला आहे. गेले
आठ दिवस दिवसाची उष्णता कमीत कमी २२ व जास्तीत जास्त ३५
डिग्री सेल्सिअसपर्यंत पोहोचली आहे.
दिवसभर कमालीचा उष्मा आणि सायंकाळी दमदार पाऊस होत आहे. एक दिवस आड पाऊस सुरू आहे. शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजता विजेच्या कडकडाटांसह पावसाने अचानक सुरुवात केली. शहराच्या काही भागात गारांसह जोरदार पाऊस झाला. अनेक भागांत वाऱ्यामुळे घरांची छते उडून गेली, तर देवकर पाणंद परिसरात रस्त्यातच छप्पर आल्याने वाहतूक काही वेळ विस्कळीत झाली.
जिल्ह्यातही पाऊस झाला. खरीप पेरणीपूर्व मशागतीसाठी हा पाऊस उपयुक्त आहे. भारनियमनामुळे उसाचे पीक करपू लागले आहे. या पावसाने थोडासा दिलासा मिळाला आहे. काढणीला आलेले सूर्यफुल, भुईमूग आदी पिकांना हा पाऊस थोडासा त्रासदायक ठरत आहे. (प्रतिनिधी)